Working in Hindi series: Sayali Deodhar | हिंदी मालिकेत काम करायचे आहेः सायली देवधर

लेक माझी लाडकी या मालिकेत सायली देवधर मीरा ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिच्या या भूमिकेविषयी आणि एकंदर तिच्या कारकिर्दीविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...

सायली तुझ्या कुटुंबातील कोणीही अभिनयक्षेत्राशी संबंधित नसताना तू या क्षेत्राकडे कशी वळलीस?
मी पुण्यातील अभिनव कला केंद्र या कॉलेजमध्ये शिकत होते. मला फोटोग्राफीची प्रचंड आवड होती. त्यामुळे मी फोटोग्राफी या विषयात विशेष शिक्षण घ्यावे असे मला वाटत होते. पण माझी चित्रकला चांगली असल्याने मी फोटोग्राफीपेक्षा चित्रकला हा विषय घ्यावा असे माझ्या वडिलांनी सुचवले. त्यामुळे मी फोटोग्राफीचा विचार सोडून दिला. पण माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी फोटोग्राफी हा विषय घेतला होता. त्यांच्यासाठी मी अनेकवेळा मॉडलिंग केले आहे. त्यामुळे कॉलेजमध्येच माझा पोर्टफोलिओ बनला होता आणि त्यात माझे अनेक मित्रमैत्रीण चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत. त्यामुळे मी चित्रपटात काम करावे असे ते मला अनेकवेळा सांगत. लग्न पहावे करून या चित्रपटातील एका व्यक्तिरेखेसाठी कोणतीही अभिनेत्री दिग्दर्शकाला योग्य वाटत नव्हती. त्यामुळे माझ्या मित्राने माझे नाव सुचवले. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण ऑडिशन घेण्याच्याआधीच या चित्रपटासाठी माझी निवड झाली होती. या चित्रपटानंतर आता आपण याच क्षेत्रात करियर करायचे असे मी ठरवले आणि पुण्यातील एका ग्रुपसोबत नाटक  केले. त्यानंतर मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली आणि माझ्या अभिनयप्रवासाला सुरुवात झाली.

लेक माझी लाडकी या मालिकेत पहिल्यांदाच तू प्रमुख भूमिका साकारत आहेस. या मालिकेत काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
मीरा सुरुवातीला खूप हळवी दाखवण्यात आली होती. तसेच ती जास्त कोणाशी बोलत देखील नसे. पण मी खऱ्या आयुष्यात अजिबातच तशी नाहीये. आता गेल्या काही भागांपासून मीरा खूप बदलली आहे. ती तिचे मत मांडायला घाबरत नाही. तिचे प्रत्येक निर्णय ती स्वतः घेत आहे. या बदललेल्या मीरामध्ये आणि माझ्यात खूपच साम्य आहे. त्यामुळे ही भूमिका साकारताना मला खूप मजा येतेय.

लेक माझी लाडकी ही मालिका सुरू झाल्यापासून तुला प्रेक्षकांच्या कशा प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत आहेत?
ही मालिका सुरू झाली, त्यावेळी तू इतके सहन का करतेस असा लोकांना प्रश्न पडत असे. पण मीराचे बदललेले रूप प्रेक्षकांना आवडत आहे. तसेच माझा लूकदेखील या मालिकेत खूप बदलला आहे. याचे देखील लोक खूपच कौतुक करत आहेत. 

ही मालिका सुरू होऊन आता वर्षं उलटले आहे. तुझ्या सहकलाकारांसोबतचे तुझे नाते कसे आहे?
मी सध्या माझ्या घरातल्यांपेक्षा जास्त वेळ सेटवर घालवते. त्यामुळे आमच्या सगळ्यांमध्ये एक छान नाते निर्माण झाले आहे. ऐश्वर्या ताई (ऐश्वर्या नारकर) सोबत तर माझे खूपच छान बाँडिंग जमले आहे. मी माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करते. आमच्या मालिकेच्या सेटवर खूपच चांगले वातावरण आहे. एखाद्याला एखादी गोष्ट पटत नसेल, तर तो लगेचच सांगून टाकतो. त्यामुळे पाठीमागून चर्चा करणे, गॉसिपिंग करणे अशा गोष्टी आमच्या सेटवर घडत नाहीत.

भविष्यात हिंदी मालिकांमध्ये काम करण्याचा काही विचार केला आहेस का?
केवळ हिंदी मालिकाच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील मला काम करायचे आहे. सध्या मी काही हिंदी मालिकांसाठी ऑडिशन देखील देत आहे. एखादी चांगली भूमिका असल्यास मी हिंदीत नक्कीच काम करेन.  

Also Read : नकुशी, गोठ, लेक माझी लाडकी, दुहेरी आणि कुलस्वामिनी मालिकेतील नायिकांचा झाला मेकओव्हर
Web Title: Working in Hindi series: Sayali Deodhar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.