These are the contestants of Big Boss Marathi ... | ​हे आहेत बिग बॉस मराठीचे स्पर्धक...

कलर्स मराठीवर सुरू झालेल्या बिग बॉस या कार्यक्रमामध्ये सगळे स्पर्धक आता घरामध्ये रहायला गेले असून ते या घरामध्ये १०० दिवस राहणार आहेत. जिथे त्यांचा बाहेरच्या जगाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क राहाणार नाहीये. बिग बॉसच्या मराठमोळ्या वाड्या मध्ये जेव्हा हे १५ स्पर्धक गेले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रत्येक गोष्ट खूपच सुंदर प्रकारे डिझाईन करण्यात आली असून प्रत्येक गोष्टीवर खूप मेहनत देखील घेण्यात आली आहे. लिव्हिंग रूम, मुलींची बेडरूम, त्यामधील मोठी नथ, आरसे, बाथरूम मधील कोल्हापूरी चपला, घरात आल्यावर असलेले तुळशी वृंदावन, सगळ्याच गोष्टी... पाहून बिग बॉसच्या घरात जाणारे सगळेच स्पर्धक प्रचंड खूश झाले. तसेच बिग बॉसच्या घराच्या सुरुवातीलाच रहिवाशी संघ असा बोर्ड आहे, जिथे सगळ्या स्पर्धकांची नावे लिहिण्यात आलेली आहेत. बिग बॉसचे घर म्हणजे स्वप्नातलं घरं आहे जणू. उमंग कुमार यांनी हे घर खूपच सुंदर बनवले आहे, ते एखाद्या वाड्यापेक्षा कमी नाहीये. बिग बॉसच्या स्पर्धकांसाठी कलर्स मराठीने वाडाच बनवला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

बिग बॉसच्या घरात या स्पर्धकांनी लावली हजेरी -
आरती सोलंकी - आरती सोलंकी ही प्रसिद्ध कॉमेडियन असून फू बाई फू या कार्यक्रमामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. 
आस्ताद काळे - अस्तादने आजवर अग्निहोत्र, पुढचे पाऊल यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो सध्या सरस्वती या मालिकेत राघवची भूमिका साकारत आहे.
अनिल थत्ते - अनिल थत्ते हे पत्रकार असून ते त्यांच्या राहणीमानामुळे ओळखले जातात. 
भूषण कडू - भूषण कडूने मस्त चाललंय आमचं, दगडाबाईची चाळ, बत्ती गुल पॉवर फुल यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
जुई गडकरी - जुई गडकरीला पुढचे पाऊल या मालिकेमुळे खरी लोकप्रियता मिळाली. तिने नुकतेच सरस्वती या मालिकेत देविका ही भूमिका साकारली होती. 
मेघा धाडे - मेघा धाडेने मानसन्मान, एक होती राणी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
पुष्कर जोग - पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 
राजेश शृंगारपुरे - राजेश शृंगारपुरेने झेंडा या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. राजेशने डॅडी, सरकार राज यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. 
रेशम टिपणीस - रेशम टिपणीसने कॅम्पस, बसेरा, सतरंगी ससुराल यांसारख्या मालिकांमध्ये तर बाजीगर, जय हो यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
ऋतुजा धर्माधिकारी - ऋतुजा धर्माधिकारीने रात्रीस खेळ चाले या मालिकेत साकारलेली सुषमा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. 
सई लोकुर - सई लोकुरने कपिल शर्माच्या किस किस को प्यार करूँ या चित्रपटात काम केले होते. 
स्मिता गोंदकर - स्मिता गोंदकरला पप्पी दे पारूला या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली. तिने मुंबईचा डब्बेवाला, हिप हिप हुर्रे यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
सुशांत शेलार - सुशांत शेलारने क्लासमेट, दुनियादारी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
उषा नाडकर्णी - उषा नाडकर्णी यांनी माहेरची साडी, सिंहासन यांसारख्या अनेक मराठी तर वास्तव, वन टू थ्री यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांनी साकारलेली खाष्ट सासूची भूमिका चांगलीच गाजली होती. 
विनीत भोंडे - विनीत भोंडेला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमात त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतल्या आहेत. 

Also Read : बिग बॉसच्या १२ व्या सिझनसाठी सुरू झाली ऑडिशन्स
Web Title: These are the contestants of Big Boss Marathi ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.