Swarajshakshak Sambhaji will be in the series Amol Kolhichi entry | स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत होणार डॉ. अमोल कोल्हेची एंट्री

जगाच्या इतिहासात पराक्रमी योद्धा, राजकारणी, साहित्यिक, रसिक असे मिश्रण ज्या एकाच राजाच्या नशिबी आले ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे भोसले. संभाजीराजांच्या पराक्रमाचे आणि बुद्धीचातुर्याचे अनेक दाखले आपण झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमधून जाणून घेतले. स्वत: शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजांची जडणघडण घडताना आपण पाहिले. पण आता स्वराज्य रक्षणासाठी शिवबांचा हा छावा मोठ्या रूपात आपल्यासमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची तमाम प्रेक्षक वाट पाहात आहेत ते तरुण तडफदार शंभूराजे प्रेक्षकांसमोर येण्याचा अखेर मुहूर्त ठरला आहे. १७ डिसेंबरच्या दोन तासांच्या विशेष भागात या मालिकेत तरुण संभाजीराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हेची एंट्री होणार आहे. 
दोन तासांचा हा विशेष भाग मालिकेत नव्या घडामोडी घेऊन येणार आहे. डॉ. अमोल कोल्हेच्या मालिकेतल्या एंट्रीसोबतच या विशेष भागात आग्र्याहून सुटेकनंतरच्या घडामोडींचा आढावा घेतला जाणार आहे. ब्राह्मण मुलाच्या वेशातील बालसंभाजी अखेर राजगडावर पोहोचणार असून त्यानंतर दोन वर्षं त्यांना औरंगाबादला पाठवण्यात येणार आहे. राजगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक देखील झालेला दाखवण्यात येणार आहे तर सोयराबाईंच्या पोटी युवराज राजाराम महाराजांचा जन्म होणार आहे. या सर्व शुभ घटना होत असतानाच एक अतिशय वाईट गोष्ट घडणार आहे. जिजाऊ यांचे निधन झाल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. रायगडावर सर्वांचे आगमन झाल्यानंतर भूतकाळातील घटनांना उजाळा मिळणार असून यातून शंभूराजांचा भूतकाळ उलगडत जाणार आहे. त्यांची नितिमत्ता, हळवेपणा, मातृ–पितृभक्ती आणि स्वराज्यभक्ती दिसून येणार आहे. अशातच संभाजीराजांचा फडशा पाडायचा असा चंग बांधून कयुमखान चालून येणार आहे. शूर आबांचे शूर छावे आता या आव्हानासाठी सज्ज झाले आहेत. दोन तासांचा विशेष भागात स्वराज्य बांधणीतल्या आणि शंभूराजांच्या जीवनप्रवासातल्या या आणि अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या विशेष भागात रायगडावर मोठ्या येसूबाईंचेही आगमन होणार आहे. मोठ्या येसूबाईंची भूमिका प्राजक्ता गायकवाड साकारत आहे. जिजाऊंचा करारी बाणा जपणारी, महाराष्ट्राची माऊली साकारणाऱ्या प्रतीक्षा लोणकर यांनीही आजवरचा हा प्रवास कायम लक्षात राहील असे सांगितले. 

Also Read : ​डॉ. अमोल कोल्हेचे नवे नाटक अर्धसत्य
Web Title: Swarajshakshak Sambhaji will be in the series Amol Kolhichi entry
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.