Surah Nava Dhasav Nava The program is organized by Mahesh Kale and Taufiq Qureshi's Rangli Jugalbandi | सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात महेश काळे आणि तौफिक कुरेशी यांची रंगली जुगलबंदी

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच यातील सेलिब्रेटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. लोकसंगीत असो, शास्त्रीय संगीत असो वा वेस्टर्न संगीत असो या गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टन्सना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. येत्या सोमवार आणि मंगळवारच्या भागामध्ये देखील असेच काहीसे घडणार आहे. या आठवड्याची थीम  Instrument अशी असून या कार्यक्रमात प्रेक्षकांना खूप वेगवेगळी गाणी ऐकायला मिळणार आहेत. 
जिम्बे या वाद्याला भारतामध्ये नावारूपाला आणणारे तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर संगीतामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले उस्ताद अल्लाराखा यांचे सुपुत्र आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे मोठे भाऊ सुप्रसिद्ध संगीतकार तौफिक कुरेशी यांनी या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावली होती. सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर या खास भागामध्ये एकाहून एक रंगतदार आणि वाद्य ज्या गाण्याचा महत्वाचा भाग आहे अशी गाणी स्पर्धकांनी सादर केली. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांना महेश काळे आणि तौफिक कुरेशी यांची सूर तालाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. महेश काळे यांची गायिकी, तौफिकजींचे जिम्बे हे वाद्य आणि ख्यातनाम सँक्सोफोन वादक श्यामराजजी यांची जुगलबंदी कार्यक्रमात रंगली होती. अलबेला सजन आयो हे गाणे सादर करत या तिघांनी उपस्थितांची मने जिंकली. 
सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या आगामी भागात ढोलकी, तबला, बासरी हे ज्या गाण्यांचे महत्त्वाचा हिस्सा आहेत अशी गाणी स्पर्धकांनी सादर केली. ज्यामध्ये शरयू दातेने मला म्हणतात पुण्याची मैना हे गाणे सादर केले. तसेच शमिका भिडेने कांदे पोहे सिनेमातील गाणे सादर केले. निहिरा जोशीने ओ सजना हे गाणे गाऊन कार्यक्रमात वेगळे रंग भरले आणि सगळ्यांची मने जिंकली.
आपल्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी शैली निवडून आणि ती तेवढ्याच उत्तम पद्धतीने सादर करून स्पर्धकांनी आपल्या कॅप्टनचे आणि तौफिक कुरेशी यांचे मन जिंकले. 

Also Read : 'सूर नवा ध्यास नवा'मध्ये लोकसंगीताचा नजराणा!
Web Title: Surah Nava Dhasav Nava The program is organized by Mahesh Kale and Taufiq Qureshi's Rangli Jugalbandi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.