Suhani Pankki was injured in Poros' set | ​पोरसच्या सेट्सवर सुहानी धानकीला झाली दुखापत

आव्हानात्मक दृश्यांचे चित्रण करत असताना अनेकवेळा अनेक कलाकारांना दुखापत होते. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पोरस या मालिकेत लाचीची भूमिका साकारणार्‍या सुहानी धानकीला देखील चित्रीकरणादरम्यान नुकतीच दुखापत झाली आहे. या मालिकेतील कलाकारांनी अंडरवॉटर डायव्हिंग, तलवारबाजी, खंजीर चालवणे, घोडेस्वारी यांसारख्या विविध कौशल्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. सुहानीला या मालिकेसाठी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याने ती सध्या घोडस्वारी शिकत होती. पण घोडस्वारी शिकल्यानंतर घोडा स्वतःहून चालवत असताना ती त्याच्यावरून पडली आणि थोडक्यात बचावली. घोडेस्वारी शिकत असताना तिचा तोल ढासळला आणि ती खाली पडली आणि झाडावर आदळली. तिचे नशीब बलवत्तर असल्याने एवढे होऊनही तिला गंभीर अशी दुखापत झाली नाही. याविषयी सुहानीने सांगितले, “मला साहसी दृश्य चित्रीत करायला खूपच आवडतात. पोरस या मालिकेतील लाचीच्या भूमिकेसाठी मला डायव्हिंग, अंडर वॉटर, तलवार आणि खंजीर चालवणे तसेच घोडेस्वारी इत्यादी कौशल्ये शिकावी लागली. मला घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मी घोडेस्वारी शिकली असे सगळ्यांना वाटले असल्याने मला चित्रीकरणासाठी घोडेस्वारी करायला सांगितले. खरे तर सराव करणे वेगळे होते. पण सेट्सवर चित्रीकरण करताना अभिनय करत कॅमेर्‍यासमोर उभे राहून घोडेस्वारी करणे फारच वेगळे होते. अशाप्रकारे चित्रीकरण करणे हे खूपच आव्हानात्मक होते. चित्रीकरण करताना मी घोडेस्वारी चांगल्या प्रकारे करेन असे मला वाटत असताना मी झाडावर आपटली. अर्थात, आमची टीम लगेच माझ्या मदतीस धावून आली. मला दुखापत झाली असली तरी तो एक रोमांचक अनुभव होता.”
पोरस राजाच्या आयुष्यावर आधारित पोरस ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेच्या कथानकाचे, या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेचे प्रेक्षक कौतुक करत आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे. 

Also Read : ​पोरसची अभिनेत्री रिया दीपसी तिच्या बॅगमध्ये ठेवते या गोष्टी

Web Title: Suhani Pankki was injured in Poros' set
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.