Struggles are important in the field of acting - Zen Imam | अभिनयाच्या क्षेत्रात स्ट्रगल महत्त्वाचा - झेन इमाम

अबोली कुलकर्णी

गुड लुकिंग आणि हॅण्डसम असलेला टीव्ही अभिनेता झेन इमाम हा सध्या स्टार प्लस वाहिनीवरील ‘नामकरण’ या हिंदी मालिकेत नीलच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. ‘टशन-ए-इश्क’,‘कैसी ये यारियाँ’ या मालिकांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्यानंतर नीलच्या आगळयावेगळया भूमिकेत तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या या आणि आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी मारलेल्या या गप्पा...

* बऱ्याच वर्षांपासून तू दिल्लीत राहतो आहेस. त्यानंतर करिअरसाठी तू मुंबईत शिफ्ट झालास. एमबीएची पदवी मिळवल्यावर अभिनयक्षेत्रात येण्याचा विचार कसा आला? 
- खरं सांगायचं तर, मी बरीच वर्षे दिल्लीत मॉडेलिंग करत होतो. छोट्या-मोठया जाहीरातीच्या शूटिंगपासून मी सुरूवात केली. पाहता पाहता बरीच वर्षे निघून गेली. अ‍ॅक्टिंग मात्र सुरूच आहे. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात जसा स्ट्रगल असतो तसाच स्ट्रगल मी अनुभवला अन् अनुभवतो आहे. अनेक गोष्टी शिकायला मिळतात.  थोडक्यात काय तर आवड असेल तर अभिनय क्षेत्रात काम करायला प्रचंड मजा येते. 

* ‘नामकरण’ मालिकेत तू नीलच्या भूमिकेत दिसतो आहेस. कसा आहे नील? काय सांगशील त्याच्याविषयी?
- आत्तापर्यंत वेगवेगळया भूमिका केल्या आहेत. मात्र, नीलची व्यक्तिरेखा ही सर्वांपेक्षा अगदीच वेगळी आहे. नील एक रोमँटिक मुलगा आहे. मात्र, तो त्याच्या घरच्यांसाठी तेवढाच काळजी घेणारा, सर्वांना आनंदी ठेवणारा असा आहे. कुटुंबियांसोबत तो तेवढाच जबाबदारीने वागतो. नीलच्या व्यक्तिरेखेतून मला बरंच काही शिकायला मिळालं. 

* मालिकेत १० वर्षांचा लीप दाखवण्यात येतो आहे. यानंतर येणाºया टिवस्टच्या बाबतीत काय सांगशील? 
- १० वर्षांच्या टिवस्टनंतर नील एकदम तरूण, हॅण्डसम झालेला दिसतो आहे. नील त्याच्या व्यक्तिमत्त्वासह अनेकांना मालिके सोबत खिळवून ठेवतो. यापुढेही मालिकेत अनेक फनी मोमेंटस, रोमँटिक मोमेंटस घडून येतील. युवावर्ग आणि फॅमिलींना क नेक्ट करण्याचा मालिकेचा विचार असून नक्कीच ‘आगे आगे देखों होता हैं क्या’ अशी काहीशी गमतीजमतीची परिस्थिती आहे. अवनी आणि नील यांच्या रिलेशनशिपचे काय होते? हे तुम्ही एपिसोडमध्ये बघितलं तरच जास्त चांगलं. 

* ‘कैसी यह यारियाँ’,‘टशन ए इश्क’ यासारख्या मालिकांमध्ये तू काम केलं आहेस. आता ‘नामकरण’च्या महत्त्वाच्या भूमिकेत तू दिसतो आहेस. मागे वळून बघतांना काय वाटते? काय शिकायला मिळाले?
- अभिनय म्हटल्यावर वेगवेगळया भूमिका आल्याच. निगेटिव्ह, पॉझिटिव्ह भूमिका आपण एक कलाकार म्हणून केल्याच पाहिजेत. ‘टशन ए इश्क’ या मालिकेत मी निगेटिव्ह भूमिका साकारली होती. आता या मालिकेत तर मी पॉझिटिव्ह भूमिका साकारतो आहे. बरंच काही शिकायला मिळते आहे. मालिके ची टीम, सहकलाकारांसोबतही खूप चांगली बाँण्डिंग आहे.

* अभिनयाची तुझी व्याख्या काय आहे? 
- अभिनय करणं हे काही सोप्पं काम नाही. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. खरंतर, तुम्ही जेवढे नैसर्गिक हावभाव करावेत, तुम्ही जसे आहात तसे स्वत:ला प्रेझेंट करणं अपेक्षित आहे. जोपर्यंत तुम्ही स्वत:वर प्रेम करायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही अभिनय करू शकत नाही, असं मला वाटतं.

* तुझ्या भविष्यातील प्रोजेक्टसविषयी काय सांगशील?
- सध्या तरी मी ‘नामकरण’च्या शूटिंगमध्येच एवढा बिझी असतो की, मला बाकीच काही करायला वेळच मिळत नाही. पण, होय, जर काही प्रोजेक्टची आॅफर माझ्याकडे आली तर नक्कीच शेअर करीन.
Web Title: Struggles are important in the field of acting - Zen Imam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.