Story is one of the most important stories in Marathi series: Azad Kale | मराठी मालिकांमध्ये कथा ही सगळ्यात महत्त्वाचीः आस्ताद काळे

आस्ताद काळेने सरस्वती या मालिकेत साकारलेली राघव ही भूमिका चांगलीच गाजली होती. पण या मालिकेत राघवचा मृत्यू झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. पण आता तो मालिकेत परतणार असून याबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

राघव ही भूमिका मालिकेत पुन्हा दाखवली जाणार असल्याची तुला कल्पना होती का?
राघव मालिकेतून गायब होणार हे खूप आधीच ठरले होते. मालिका सुरू झाल्यानंतर हे लगेचच घडणार होते. पण राघवची लोकप्रियता पाहाता हे कथानक थोडे पुढे ढकलण्यात आले. राघव मालिकेत परत येणार की नाही याबाबत काहीही ठरलेले नव्हते. पण राघव परत येईल याची जास्त शक्यता होती. आता राघव मालिकेत परत आल्यावर मालिकेच्या कथानकाला एक कलाटणी मिळणार आहे. 

व्यक्तिरेखेचा मृत्यू झाल्याचे दाखवल्यानंतर ती व्यक्तिरेखा पुन्हा मालिकेत आणणे हा ट्रेंड आपल्याला हिंदीत पाहायला मिळत होता. हा ट्रेंड आता मराठीत रुजू होतोय असे तुला वाटते का?
मराठीत असा कोणताही ट्रेंड रुजू होतोय असे मला वाटत नाही. कारण हिंदी मालिकेत एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिरेखेचा मृत्यू दाखवला आणि ते प्रेक्षकांना पसंत पडले नाही तर ती व्यक्तिरेखा मालिकेत पुन्हा दाखवली जाते. पण मराठीत तसे होत नाही. मराठीत कोणत्याही व्यक्तिरेखेपेक्षा कथा ही अधिक महत्त्वाची असते. मराठीत देखील काही वेळा टिआरपीप्रमाणे मालिकेचे कथानक बदलावे लागते. पण तरीही आपल्याकडे कथेलाच प्राधान्य दिले जाते.

तू अनेक वर्षं मालिकांमध्ये काम करत आहेस, गेल्या काही वर्षांमध्ये मालिकाक्षेत्रात काय बदल झाला आहे असे तुला वाटते?
मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात करून आता अनेक वर्षं झाली आहेत. सुरुवातीच्या काळातच मला खूप चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करायला मिळाले. त्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. त्यावेळेचे मालिकेतील संवाद हे खूप चांगले असायचे. पण सध्याच्या मालिकेतील संवाद हे खूपच भयंकर असतात असे मला वाटते. संवाद लिहिताना मराठी भाषेबद्दल आस्था बाळगून काम करण्याची गरज आहे. सध्या अनेक वेळा खूपच वाईट आणि अर्थहिन भाषा मालिकांमध्ये वापरली जात आहे. आजच्या घडीला केवळ बोटावर मोजण्याइतके चांगले लेखक आहेत. आपल्या आजूबाजूला अनेक ज्येष्ठ कलाकार आहेत. या कलाकारांना भाषेचे खूप चांगले ज्ञान आहे. त्यांच्याकडून काही जाणून घेण्याची, त्यांच्याकडून शिकण्याची आजच्या संवाद लेखकांना इच्छाच नाहीये असे मला वाटते. 

तू वेबसिरिजमध्ये काम करण्याचा काही विचार केला आहेस का?
वेबसिरिजमध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे एखादे चांगले प्रोजेक्ट आले तर मी नक्कीच वेबसिरिजमध्ये झळकेल. आजच्या काळातील हा खूपच रंजक मीडिया आहे. त्याला कोणतेही बंधन नाहीत की सेन्सॉर नाही. त्यामुळे अशा मीडियात काम करायला मला नक्कीच आवडेल. 
Web Title: Story is one of the most important stories in Marathi series: Azad Kale
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.