Signature reader and Namrata Pradhan will be seen in the series of umbrellas | संकेत पाठक आणि नम्रता प्रधान ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार छत्रीवाली या मालिकेत

स्टार प्रवाहने आजवर आपल्या मालिकांतून वेगवेगळी कथानकं सादर केली आहेत. उत्तम कलाकार, दर्जेदार निर्मितीमूल्यं आणि नवा आशय मांडणारी गोष्ट हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन स्टार प्रवाह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. ‘छत्रीवाली’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेचे नाव आजवरच्या सगळ्या मराठी मालिकांपेक्षा हटके असल्याने ही मालिका देखील हटके असेल असे सगळ्यांना वाटत आहे. या मालिकेच्या नावाप्रमाणेच या मालिकेतील पात्रसुद्धा हटके आहेत.
छत्रीवाली या मालिकेत प्रेक्षकांना एका मुलीची कथा पाहायला मिळणार आहे. छत्रीवाली ही गोष्ट आहे आत्मविश्वासू, कष्टाळू आणि साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या मधुराची. तर तिकडे जबाबदारीचं भान नसलेला, लाडात वाढलेला मधुराच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा आणि तिच्या साधेपणाची सतत टिंगल उडवणारा विक्रम आहे. योगायोगाने विक्रमच्याच ऑफिसमध्ये मधुराणीला जॉबची ऑफर मिळते. आपल्या तालावर मधुराणीला नाचवू पाहणाऱ्या विक्रमला मधुराणी शरण जाते की त्यालाच सरळ करते? नात्याच्या छत्रीखाली या दोघांचं नातं बहरतं का अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधायची असतील तर छत्रीवाली ही मालिका पाहायलाच हवी.
छत्रीवाली या मालिकेत संकेत पाठक आणि नम्रता प्रधान ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संकेत पाठकने या पूर्वी स्टार प्रवाहच्याच दुहेरी या लोकप्रिय मालिकेत दुष्यंत ही व्यक्तिरेखा साकारली होती तर नम्रताची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेच्या प्रोमोजनी सोशल मीडियामध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.  या मालिकेचा प्रोमो पाहून या मालिकेचे नाव छत्रीवाली का ठेवले आहे असा प्रश्न नक्कीच उपस्थित होत आहे. ही नायिका आपल्याला प्रत्येक भागात छत्रीसोबतच पाहायला मिळणार असे आपल्याला हा प्रोमो पाहूनच कळत आहे. छत्रीवाली ही मालिका १८ जूनपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. 

Also Read : संकेत पाठक ‘दोस्तीगिरी’तून करतोय चित्रपटसृष्टीत पदार्पण
Web Title: Signature reader and Namrata Pradhan will be seen in the series of umbrellas
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.