माणसं जोडल्याने आयुष्याला ‘दिशा’ मिळाली : श्रेया बुगडे

By अबोली कुलकर्णी | Published: August 21, 2018 07:17 PM2018-08-21T19:17:26+5:302018-08-21T19:20:44+5:30

विनोदी अन् गंभीर भूमिका लीलया पेलणारी अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणून तिच्याकडे प्रेक्षक पाहत आहेत. ‘तू तिथे मी’ या मालिकेमुळे तिची घराघरांत ओळख निर्माण झाली.

Shreya Bugde says,' Connect people to my life' | माणसं जोडल्याने आयुष्याला ‘दिशा’ मिळाली : श्रेया बुगडे

माणसं जोडल्याने आयुष्याला ‘दिशा’ मिळाली : श्रेया बुगडे

googlenewsNext

अभिनेत्री श्रेया बुगडे ही मराठी चित्रपटसृष्टीला मिळालेला नवा ‘हिरा’च जणूकाही. विनोदी अन् गंभीर भूमिका लीलया पेलणारी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे प्रेक्षक पाहत आहेत. ‘तू तिथे मी’ या मालिकेमुळे तिची घराघरांत ओळख निर्माण झाली. ‘चला हवा येऊ द्या’च्या निमित्ताने तिच्या अभिनयातील विनोदी किनारही प्रेक्षकांना समजली. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कामगिरी  करताना तिने प्रचंड मेहनत घेतली. आता या शोचे ४०० भाग पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने प्रेक्षकांकडून संपूर्ण टीमचे कौतुक करण्यात येत आहे. यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही हितगुज...

 * ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने ४०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. काय सांगशील?
- खरं सांगायचं तर, आमची टीम एवढी ग्रेट आहे की, आम्हाला एवढे भाग झालेत हे खरंच वाटत नाही. पहिल्यांदा असं वाटलं की आता २०० भाग झाले आहेत आता शो संपेल, नंतर महाराष्ट्रभर दौरे आम्ही केले. तेव्हा आता वाटले की, शो आता तरी नक्कीच संपेल. पण, तसं झालं नाही. आता ४०० भागानंतरही शो कायम सुरू आहे. यात प्रेक्षकांचे प्रेम, पाठिंबा, सहकार्य आहे त्यामुळेच आम्ही चांगलं काम करू शकतोय. आम्ही जे विनोद करतो त्यामुळे अनेक पेशंट्स यांना चार सुखाचे क्षण उपभोगता येत असतील तर यापेक्षा दुसरे भाग्य ते कोणते?, असे मला वाटते.

 * ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्ताने २० ते २४ आॅगस्टदरम्यान रोज भाग असणार आहेत, याबद्दल काय सांगशील?
- होय, ही खरंतर प्रेक्षकांसाठी पर्वणीच म्हणता येईल. आम्हाला या निमित्ताने आता रोज प्रेक्षकांच्या भेटीला येता येणार आहे. प्रेक्षकांसाठी ही खऱ्या  अर्थाने धम्माल असणार आहे. आम्हाला प्रेक्षकांचे फोन येत असतात की, तुम्ही दररोज शो ठेवत जा. पण मग आम्ही त्यांना म्हणतो की, जर आम्ही रोज तुम्हाला भेटायला आलो तर तुम्हाला तेवढी मजा येणार नाही. प्रेक्षकांचे एवढे प्रेम मिळते तेव्हा खरंच खूप छान वाटतं. 

 * तुमच्या टीममध्ये काही नवीन सदस्य सहभागी होणार आहेत. त्यासाठी वेगवेगळया शहरांमध्ये आॅडिशन्सही सुरु आहेत, काय सांगशील याबद्दल?
- नक्कीच आनंद होतोय. नवीन सदस्य आमच्या घरात येणार म्हणून आम्ही सगळेच उत्साहित आहोत. कारण त्याच्यासोबत आम्ही नवं नातं निर्माण करणार आहोत. आणखी मजा येणार. ही खरंतर सुवर्णसंधी आहे. त्या संधीचं सोनं करावं, असं वाटतंय.

* तुमच्या सगळयांची आॅफस्क्रीन बाँण्डिंग कशी आहे? एवढ्या सगळया पुरूषांसोबत तू स्किटस करत असतेस, कधी दडपण येतं का?
- अर्थात, खूप मस्त आहे. आम्ही खुप धम्माल करतो. स्किट करताना मला कधीही दडपण येत नाही. त्यांनी मला कधीही एक महिला म्हणून डावललं नाही. ते कायम मला सांभाळूनच घेत आले आहेत. कधी कधी तर असं असायचं की, माझ्याकडे एकही डायलॉग नसायचा. त्यांनी स्वत: त्यांच्या स्किटसमधले डायलॉग्ज माझ्यासाठी राखून ठेवले आहेत. ते कायम मला पाठिंबा देतात. त्यांच्यामुळेच मी स्वत:ला खूप खंबीर मानते.

 * कोणत्याही भूमिकेत तू एवढी परफेक्ट कशी काय दिसतेस? काय आहे तुझ्या अभिनयाचं रहस्य?
- खरंतर माझ्या वाटयाला जी भूमिका येते तिला मी आपलंसं करते. भूमिकेत शिरून मी त्या भूमिकेप्रमाणेच वागू लागते. रहस्य वगैरे काहीही नाहीये. आपल्या पदरात पडलेल्या भूमिकेला न्याय मिळवून देणं हेच एक कलाकार म्हणून आमचं परमकर्तव्य असतं, तेच मी देखील करते.

 * ‘तू तिथे मी’ मधून तू घराघरांत पोहोचलीस. कसा घेतला अभिनयक्षेत्रात वळण्याचा निर्णय?
- मी वयाच्या ८व्या वर्षापासूनच मी बालनाटयातून काम केलं. शाळा-कॉलेजातून मी अनेक कलाप्रकारांमध्ये काम करायला सुरूवात केली. मग तू तिथे मी या मालिकेपासून माझा चेहरा प्रेक्षकांसाठी ओळखीचा ठरला. मला प्रसिद्धी मिळू लागली. मग मला एकदा विनोदी शोची आॅफर आली. मी कधीही विनोदी शो केला नव्हता. पण, प्रयत्न केला आणि मी यशस्वी झाले. 

*  तू तुझ्या आईच्या खूप क्लोज आहेस. काय सांगशील?
- होय, मी माझ्या आईची खूप जवळची आहे. माझी आई खरंच खूप वेगळया प्रकारची आहे. ती माझी सपोर्ट सिस्टीम आहे. अनेकदा मी द्विधा मनस्थितीत असेल तर ती माझ्यामागे खंबीरपणे उभी राहते. तिच्यातील सगळी पॉझिटिव्ह एनर्जी ती मला लावते. त्यामुळे मला कायम यश मिळत आले आहेत. पार्टीसाठी ड्रेस निवडणं, माझी सगळी तयारी करणं हे सगळं मी तिच्यामुळेच करू शकते. ती माझ्यासोबत टॅटू देखील काढायला येते. माझ्यासाठी शॉपिंग करते. 

* तुझा फॅशन सेन्स आणि टॅटू बद्दल बरीच चर्चा आहे. काय सांगशील?
- माझा फॅशन सेन्सबद्दल म्हणाल तर, माझ्यासाठी सगळं काही आईच निवडते. तिच्या साड्या मी वापरत असते. तिला फॅशनचा उत्तम सेन्स आहे. टॅटूबद्दल म्हणाल तर मला आवडतं, नवीन गोष्टी स्विकारायला. छान राहायला, वागायला, बोलायला मला खूप आवडतं. 

 * तुझ्या छंदाविषयी काय सांगशील?
- मला स्वयंपाक सोडून बाकी सगळयांत रस आहे. मला चांगले कपडे घालायला, घर सजवायला, घरासाठी शॉपिंग करायला, रोज कुशन-कव्हर बदलायला आवडतं. 

* आॅनस्क्रीन श्रेया तर आम्ही बघतोच पण, घरी श्रेया कशी असते?
-  अगदी तुम्ही आॅनस्क्रीन पाहता तशीच आहे. मला माणसं जमवायला, जोडायला आवडतं. नातेवाईक, सण वार, उत्सव, नाती जोडायला मला आवडतं. जेव्हा मी एकटी असते, तेव्हा मी सगळयांत जास्त बोअर होते.

 * प्रेक्षकांना हसवणं अवघड आहे की सोप्पं?
- प्रेक्षकांना हसवणं खूप अवघड आहे. आमचे लेखक डॉ. निलेश साबळे हे चांगले स्किट्स लिहितात आणि आमच्याकडून चांगले कॅरेक्टर्स घडवून आणतात. प्रेक्षकांना आमचा शो एवढा आवडतो की, ते अक्षरश: आमच्या शोची वाट पाहत असतात. त्यांचे फोन येतात की, तुम्ही सोमवार व मंगळवार आम्ही अगदी शोची वाट पाहत असतो, हीच खरंतर आमच्यासाठी पावती आहे. 

 * शूटिंगच्या बिझी शेड्यूलमुळे अशी कोणती गोष्ट आहे जी तू मिस करतेस? 
- पतीला वेळ देणं. खरंतर मी माझ्या पतीला वेळ देणं खूप मिस करते. आम्ही सहा-सहा महिने एकमेकांना भेटू शकत नाही. एकत्र जेवायला जात नाही. माझं शूटिंगचं शेड्यूल हे खूप बिझी असल्याने तो मला समजून घेतो. मात्र, मी या गोष्टी खूप मिस करते.

 * इतके वर्ष झाले तू अभिनयाच्या क्षेत्रात आहेस. कसं वाटतं मागे वळून बघताना? किती समृद्ध झालंय आयुष्य? 
- खूप संपन्न झाल्यासारखं वाटतंय. या मार्गात अनेक माणसं मी जोडली. पैसा तर सगळेच कमावतात. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मोठया लोकांचं मार्गदर्शन मिळालं. आता माझ्या आयुष्यात खरंच खूप चांगली स्टेज आहे. कारण मी एक ‘समुद्र’ नावाचं गंभीर नाटक देखील करतेय. यात माझ्यासोबत अभिनेता चिन्मय मांडलेकर असणार आहे. ‘तू तिथे मी’ नंतर आम्ही पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहोत. हा माझ्यासारख्या कलाकारासाठी एक आनंदाचा क्षण आहे.

 *  आम्ही ‘चला हवा येऊ द्या’ बघतो आणि आमचा ताण कमी होतो. तसं तुझ्यासाठी काय आहे ज्यामुळे तुझा ताण कमी होतो?
- शॉपिंगमुळे. मी नाराज, दु:खी, वैतागलेली असले तर मी आणि आई आम्ही शॉपिंगला जातो. ज्यामुळे माझा ताण कमी होतो.

 * चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर कुणासोबत करायला आवडेल?
- चित्रपटाची संहिता चांगली असावी, एवढीच माझी अट आहे. स्टारकास्ट कोण आहेत ? साजेसे आहेत की नाही? हे तितकंसं महत्त्वाचं नाही. पण, मला चित्रपट करायला नक्कीच आवडेल.
 
 * फॅन्सकडून जेव्हा भरभरून प्रेम मिळतं तेव्हा कसं वाटतं? एखादा किस्सा शेअर करशील?
- खूप छान वाटतं. लोक एवढं भरभरून प्रेम करतात, ते पाहून छान वाटतं. कुणीही आमच्याकडून पैसे घेत नाही. अनेकदा एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर तिथे आमच्याकडून बिलाचे पैसे घेतले जात नाहीत. एकदा तर मी आणि माझी मैत्रीण जेवायला गेलो तेव्हा वेटर म्हणाला की, मॅडम तुमचं बिल आधीच दिले आहे. एका मुलीने आमचे बिल दिले होते. तिला विचारले तेव्हा ती म्हणाली की, ‘माझी आई गेल्या काही महिन्यांपासून अंथरूणाला खिळलेली आहे. पण, तुमच्या शोमुळे माझी आई पुन्हा हसू लागली, आनंदात राहू लागली. त्यासाठी मी एवढं तर नक्कीच करू शकते. 

Web Title: Shreya Bugde says,' Connect people to my life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.