Shocking! The series of Tarak Mehta's reverse chakra will be released by Popat Lal, which means Shyam Pathak? | ​Shocking! तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक सोडणार मालिका?

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सुरू झाल्यापासूनच श्याम पाठक या मालिकेचा भाग आहे. श्याम या मालिकेत साकारत असलेली पोपटलालची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते. पोपटलालचे लग्न कधी होणार हा प्रश्न सगळ्यांना सतावत आहे. पोपटलालच्या फॅन्ससाठी तर हा एक जागतिक प्रश्न बनला आहे. पण पोपटलालच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. पोपटलालला ही मालिका सोडण्यासाठी निर्मात्यांनी सांगितले असल्याचे म्हटले जात आहे.
स्पॉटबॉय या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार श्याम पाठकने तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडावी असे त्याला या मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. श्याम पाठक आणि असित मोदी यांच्यात झालेल्या वादानंतर श्यामला मालिका सोडायला सांगण्यात आले. या कार्यक्रमात जेठालालची भूमिका साकारणारा दिलीप जोशी नुकताच लंडनला एक लाइव्ह शो साठी गेला होता. लंडनला जायचे याबाबत त्याला खूप दिवस आधीपासून कल्पना असल्याने त्याने याबाबात प्रोडक्शन हाऊसकडून परवानगी घेतली होती. 
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठालाल आणि पोपटलाल यांचे ट्युनिंग प्रेक्षकांना खूप आवडते. त्यामुळे जेठालालसोबत पोपटलालने देखील लंडनमध्ये परफॉर्म करावे असे आयोजकांना वाटत होते आणि त्यामुळे त्यांनी दिलीप जोशीला याबाबत विनंती केली. दिलीपने श्यामला विचारल्यावर तो देखील तयार झाला. श्यामकडे खूपच कमी वेळ असल्याने प्रोडक्शन हाऊसला काहीही न कळवता तो लंडनला रवाना झाला. श्याम परदेशात असल्याने त्याच्यासोबत काहीही संपर्क देखील होत नव्हता. त्यामुळे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे चित्रीकरण खोळंबले होते. श्याम परत आल्यावर याबाबत त्याला विचारण्यात आले असता चर्चेचे रूपांतर वादात झाले आणि असित मोदींनी श्यामला मालिका सोडायला सांगितले. तसेच पुढील चार दिवस चित्रीकरण करायचे नाही असे देखील सांगितले. श्यामने माफी मागितल्यानंतरच त्याला पुन्हा चित्रीकरण करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची चर्चा आहे. 
श्याम पाठक आणि असित मोदी यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राशी बोलताना या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. याविषयी असित मोदी सांगतात, कोणताही कलाकार काही दिवसांसाठी चित्रीकरण करत नाहीये असे पहिल्यांदाच होत नाहीये. अनेकवेळा सहा-सात दिवस कलाकार चित्रीकरण करत नाहीत. पण जेव्हा मालिकेच्या दृश्याप्रमाणे कलाकाराची गरज असते. तेव्हा त्याला नक्कीच बोलवण्यात येते. 
या प्रकरणाविषयी श्याम पाठक सांगतो, अशा प्रकारच्या अफवा कोण पसरवते आहे हेच मला कळत नाहीये. मी मालिकेसाठी चित्रीकरण करत आहे. त्यामुळे अशा अफवा पसरवू नयेत असेच मी सगळ्यांना सांगेन.  

Also Read : तारक मेहता का उल्टा चष्मातील दयाबेन म्हणजेच दिशा वाकानीने नुकताच केला शेवटचा भाग चित्रीत
Web Title: Shocking! The series of Tarak Mehta's reverse chakra will be released by Popat Lal, which means Shyam Pathak?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.