Shivani Tomar and Rahul Sharma will meet Lakshman Rekha in this series | ​शिवानी तोमर आणि राहुल शर्मा झळकणार मिटेगी लक्ष्मण रेखा या मालिकेत

आजच्या काळात लिंगसमानता, महिलांचे स्वातंत्र्य, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण या बद्दल जगभरात तावातावाने बोलले जात असताना देखील अनेक महिलांना त्यांचे हक्क मिळत नाही. आजही बऱ्याचदा महिलांनाच लक्ष्य केले जाते आणि काहीही झाले तरी त्याबाबत महिलांनाच प्रश्न विचारले जातात. महिलांभोवती आखलेल्या सीमारेषा आणि सामाजिक नियम योग्य आहेत का? कांचन आणि विशेष यांच्या नजरेतून या विचारांच्या मूळापर्यंत जात & TV या वाहिनीने मिटेगी लक्ष्मण रेखा ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहे. २८ मे २०१८ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. कांचन... एक आधुनिक मुलगी. समाजातील सीमारेषा तिला तिच्या स्वप्नांपासून कधीही रोखू शकल्या नाहीत. पण, ती तिच्या मनातल्या गोंधळाशीच सामना करते आहे. ती विशेषला भेटते, त्यानंतर तिच्या आयुष्याला खरे वळण मिळते. विशेष हा कांचनसारखाच विचार करणारा आधुनिक मुलगा आहे. त्याला समाजातली पुरुषसत्ताक मानसिकता अजिबात मान्य नाही. 
शशी सुमीत प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड या निर्मितीसंस्थेने निर्माण केलेल्या मिटेगी लक्ष्मणरेखा या मालिकेत शिवानी तोमर आणि राहुल शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मथुरेच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या मालिकेत कांचन आणि विशेष या दोन भिन्न वातावरणात वाढलेल्या पात्रांची कथा रंगवण्यात आली असून हे दोघेही प्रगत विचारांचे आणि सारख्याच तत्वांना मानणारे आहेत. कांचन अत्यंत सामान्य कुटुंबातून आली असून तिचे स्वतःचे ब्युटी पार्लर आहे. विशेष हा मात्र राजेशाही घराण्यात जन्माला आलेला तरुण आहे. 
कांचनचे पात्र रंगवताना आलेल्या अनुभवांबाबत बोलताना शिवानी तोमर सांगते, “मला तुम्ही यापूर्वी ज्या भूमिकांमध्ये पाहिले आहे, त्यापेक्षा कांचनचे पात्र अतिशय वेगळे आहे. ती कुटुंबवत्सल आणि प्रत्येक बाबतीत स्वतंत्र आहे. आपले आयुष्य कायमचे बदलू शकेल अशी एकही अनियोजित आणि अप्रिय घटना आपल्या आयुष्यात घडूच शकत नाही, असा तिचा ठाम विश्वास असतो. आपले व्यक्तिमत्व आणि आयुष्य घडवण्याचा, त्याला आकार देण्याचा निर्णय, निवड संपूर्णतः आपली असते. इतके सुंदर आणि शक्तिशाली आणि अनेकांना प्रेरणा देणारे पात्र वठवण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे." विशेषची भूमिका साकारणारा राहुल शर्मा सांगतो, “परिस्थितीचे स्वतःच्या पद्धतीने विश्लेषण करून मगच योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवणारा विशेष हा स्वतंत्र विचारांचा प्रगत तरुण आहे. समाजाने आखून दिलेल्या व्याख्या तो मानत नाही."
शिवानी तोमर आणि राहुल शर्मा यांच्यासोबतच ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी, वैष्णवी मॅकडोनाल्ड, अमित ठाकूर, राहूल लोहानी आणि रवी गोसेन यांसारख्या कलाकारांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.

Also Read : अभिनयक्षेत्रात संयम राखणे गरजेचेः शिवानी तोमर
Web Title: Shivani Tomar and Rahul Sharma will meet Lakshman Rekha in this series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.