Saurabh Gokhale will be seen in the role of Saint Dnyaneshwar in the series 'You Are My Story' | ‘तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये सौरभ गोखले संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत झळकणार

‘तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये प्रेक्षकांना तुकारामांची विठूरायावर असलेली निस्सीम भक्ती बघायला मिळाली. भरत जाधव यांनी साकारलेली विठ्ठलाची भूमिका  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेमं दिले. आता मालिकेमध्ये नवा अध्याय सुरु झाला असून विठ्ठल  –रखुमाईच्या संसारगाथेनंतर प्रेक्षकांना तुकारामांच्या मुखी संत नामदेवांचे जीवनपर्व ऐकायला मिळतं आहे. संत नामदेवांची भूमिका विक्रम गायकवाड तर परी तेलंग ही नामदेवांच्या पत्नीच्या म्हणजेच राजाईच्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेमध्ये लवकरच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'आवाज' या मालिकेमध्ये सौरभ गोखलेने वठवलेल्या ज्ञानेश्वरांच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळेच पुन्हाएकदा सौरभ गोखले “तू माझा सांगाती” मालिकेमध्ये ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत दिसणार आहे. 
 
सौरभ गोखले आपल्या भुमिकेविषयी बोलताना म्हणाले, “आवाज मालिकेमध्ये मला संत ज्ञानेश्वरांची भूमिका करण्याची एक दुर्मिळ संधी मिळाली आणि प्रेक्षकांनी माझ्या प्रयत्नांना दाद दिली. लाखो लोकांच्या हृदयात वसलेल्या या व्यक्तिमत्वाला साकारणं ही एक अत्यंत जबाबदारीची आणि अवघड कामगिरी खरतरं मी केवळ दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांच्यामुळे पेलू शकलो. आता पुन्हा “तू माझा सांगाती” या मालिकेत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारायला आमंत्रण येणं हे खरतरं केलेल्या कामाची पावती मिळाल्यासारखचं आहे. लोकांच्या मनात असलेल्या त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का न लागता पडद्यावर साकारणं हे आव्हानं जणू ज्ञानेश्वरांच्या आशीर्वादानेच पार पाडता आलं असावं. या पुढेही त्यांची व्यक्तिरेखा साकारताना या मोठ्या जबाबदारीची जाणीव ठेऊनच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याची काळजी घेईन”.
 
नामदेवांचा जन्म एका शिंपी पण विठ्ठलभक्त घराण्यात झाला. नामदेवांना लहानपणापासून विठ्ठल भक्ती करणं प्रिय होते. विठ्ठलाची सेवा आणि त्यांचे नामस्मरण करतं करतचं नामदेव मोठे झाले. परंतु बघता बघता नामदेवांना त्यांच्या विठ्ठल भक्तीचा गर्व झाला. आपल्यासारखा विठ्ठल भक्त साऱ्या विश्वामध्ये नाही असा अहंकार त्यांना झाला. पण हे सगळं बघत असलेल्या विठ्ठलाला हे रुचलं नाही आणि नामदेवांना चाप बसायला हवा असं त्यांना वाटले. एक दिवस निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई यांच्यासह नामदेव संत गोरा कुंभार यांच्याकडे गेले. संत नामदेवांना कसा संत गोरा कुंभार यांनी मार्ग दाखवला ? कसा त्यांचा अहंकार दूर झाला ? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.अशाप्रकारे विठ्ठल भक्तीमध्ये आयुष्य वेचणाऱ्या संतश्रेष्ठ नामदेवांच्या थोरवीच्या अनेक कथा मालिकेमध्ये रसिकांना बघायला मिळणार आहेत.
Web Title: Saurabh Gokhale will be seen in the role of Saint Dnyaneshwar in the series 'You Are My Story'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.