As Rohini Hattangadi says, patience is just the key to success | रोहिणी हट्टंगडी म्हणतायेत, ​संयम हीच यशाची गुरुकिल्ली

मोठा पडदा असो किंवा मग छोटा पडदा... त्यांनी साकारलेली आई सा-यांनाच भावली... छोट्या पडद्यावर आईआजी तर घराघरात लोकप्रिय... अशा सा-यांच्या लाडक्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. 'सख्या रे' या आगामी मालिकेतून त्या रसिकांच्या भेटीला येणार आहेत. याचनिमित्ताने रोहिणी हट्टंगडी यांच्याशी मनमोकळ्या  मारलेल्या गप्पा.
 
 
आईआजी अजूनही रसिकांच्या मनात घर करुन आहेत,त्यातच आता पुन्हा एकदा माँसाहेब बनून छोट्या पडद्यावरील दणक्यात पुनरागमनासाठी सज्ज आहात ?
 

'होणार सून मी या घरची' या मालिकेतली 'आईआजी'ची भूमिका ही पूर्णपणे वेगळी होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील, नवरा गेल्यानंतर पुढे काय माहित नसूनही स्वतःच्या हिंमतीवर तिने स्वतःचं उद्योग साम्राज्य उभे केलेली अशी खंबीर स्वभावाची आईआजी होती. तिची स्वतःची अशी वेगळी ओळख आणि पुरोगामी मतं होती. तिच्या विचारावर संपूर्ण कुटुंब चालत असते. प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी आणि प्रेरणादायी वाटावी अशी ती भूमिका होती. दुसरी माँसाहेब या घराण्याचा वारसा पुढे नेतात. घरातून तिचा नातू हरवला आहे. त्याच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच तो गायब झाला आहे. वर्षभर तो मिळत नाही. तो आता परतलेला नाही. मात्र तो अचानक परत आला तर असा भावनिक विचार करणारी माँसाहेब आहे. तिच्या नातवासारखाच दिसणारा कुणी तरी तिला आपला नातू वाटतो. यातून या मालिकेची कथा पुढे जाते. या मालिकेला आणि भूमिकेला थोडा भावनिक टच आहे.
 
मालिका स्वीकारण्याआधी कोणत्या गोष्टींचा विचार करता?
 
मालिकेतली भूमिका स्वीकारण्याआधी फारसा विचार करत नाही. कारण मालिकेचा ट्रॅक पुढे कुठेतरी भरकटण्याचा धोका असतो. रसिकांच्या आवडीनिवडीवरच मालिकेचे भवितव्य अवलंबून असते. एखाद्या मालिकेचं कथानक रसिकांना खूप आवडेल तर कुठल्या मालिकेचं कथानक त्यांना आवडणार नाही हे सांगता येणं थोडं कठीणच. साधारणपणे मालिकेतील भूमिका स्वीकारताना मालिकेच्या कथानकात माझ्या भूमिकेला कितपत वाव आहे याचा विचार करते. मालिका किती लांबली जाईल हे सांगणे कठीण असते. त्यामुळे माझ्या भूमिकांमध्ये वैविध्यपणा ठेवण्याचा प्रयत्न मी करते.
 
दूरदर्शनवरील मालिकांचा काळ आपण पाहिलाय.तेव्हापासून ते आजतागायत मालिका सादरीकरणामध्ये आलेल्या स्थित्यंतराबाबत काय सांगाल?
 

दूरदर्शनवरील मालिका या आठवड्याला असायच्या. 'सैलाब' ही मालिका दर मंगळवारी प्रसारीत होत असे. प्रत्येक मालिकेला ठरलेला वार होता. मात्र सध्या डेली सोपमुळे बराच फरक पडला आहे. डेली सोपमध्ये मालिकेचा गाभा असलेले कथानक संपले की त्यात रसिकांना फारसा रस राहत नाही असे वाटते. 'बालिका वधू' या गाजलेल्या मालिकेबाबतही हेच झाले असे मला वाटते. 'बालविवाह' सारख्या समाजातील वाईट चालीरिती आणि परंपरेवर भाष्य करणारी ही मालिका होती. जोवर या मालिकेत बालिका वधू होती. तोवर या मालिकेवर रसिकांनी भरभरुन प्रेम केले. मात्र मालिकेतून बालिका वधूचे कथानक संपले आणि मालिकेची रयाच गेली. एखाद्या मालिकेची कथा संपली की ती मालिका तिथेच संपली पाहिजे या मताची मी आहे.
 
आजच्या कलाकारांसाठी मालिकांमुळे अनेक संधी आहेत असे वाटते का ?
 
पूर्वीच्या काळी आम्ही थिएटर-सिनेमा आणि कधी झाले तर टीव्ही मालिकांमध्ये काम करायचो. काम मिळेपर्यंत आम्हाला वाट पाहावी लागायची.आम्हाला त्या कलेविषयी आतून आवड होती. त्यामुळे आम्ही वाट पाहू शकलो. मात्र आता चित्र बदलले आहे. जग बरेच पुढे गेले आहे. सध्या ब-याच प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या संधीमुळे वाट पाहण्याची,प्रतीक्षा करण्याची कुणाचीही इच्छा नाही. खरेच एखाद्या व्यक्तीमध्ये टॅलेंट आहे का हे सुद्धा कधीकधी कळत नाही. एखाद्या गोष्टींमध्ये तुमचा रस असेल तर तुम्ही दहा वर्षसुद्धा वाट पाहू शकता. नवाजुद्दीन सिद्दीकीचेच उदाहरण घ्या ना. अभिनयात त्याला आवड होती. संधीसाठी त्याने जवळपास 20 वर्ष वाट पाहिली. 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात स्टेशनवर चोरी करणारा कलाकार आठवतो का ? तो कलाकार म्हणजे आजचा आघाडीचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. मोठी भूमिका मिळेपर्यंत त्याने आपल्या आवडीपोटी छोट्या छोट्या भूमिका साकारल्या.मोठी भूमिका मिळेपर्यंत जिद्द काही सोडली नाही.

सध्याचे सिनेमाविषयी काय सांगाल. सिनेमात कुठल्या भूमिका आपल्याला करायला आवडतील?
 
आता आपल्या सिनेमाची क्षितीजं विस्तारत आहेत. भारतीय सिनेमा, मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमाची जगभर चर्चा होते. जागतिक पातळीवर आपला सिनेमा कुठे आहे हे आपल्याला कळायला लागले आहे. सिनेमाच्या तंत्रामध्ये बदल झालेत. मात्र टेक्निकच्या मागे जाऊन कंटेट आपण गमावतोय की काय असे वाटते. रसिकांना पुन्हा एकदा बिग बजेट सिनेमांपेक्षा कमी बजेटवाले सिनेमा भावतायत. सिनेमा बिग बजेट असो किंवा कमी बजेटचा त्यातील कंटेट चांगला आणि रसिकांच्या काळजाला भिडणारा असला पाहिजे. 'व्हेंटिलेटर'सारखा सिनेमा रसिकांना खूप खूप भावला. सध्या रसिकांकडे चॉईस आहे. कुठला सिनेमा पाहावा हे त्यांच्या आवडीनुसार ठरवतात. मी स्वतः एक थिएटर पर्सनालिटी असल्यामुळे मला कमी बजेटच्या सिनेमात काम करायला आवडेल आणि मी ते करत आहे. अभिनय कारकिर्दीची सुरुवात आणि तेव्हाच्या काही आठवणी याविषयी काय सांगाल?
 
मला अभिनय आवडतो आणि मला फक्त स्टेजवर अभिनयच करायचा होता.वयाच्या 28व्या वर्षी मी हिंदी सिनेमात आले त्यावेळी मी ओव्हरएज होते. मात्र मी तसा काही विचार केला नाही की मला फक्त हिरोईनच व्हायचे आहे. माझ्या वाट्याला येईल ती भूमिका मी साकारली. भूमिका छोटी आहे की मोठी याचा विचार न करता छान भूमिका आहे हा विचार करुन ती भूमिका साकारली. माझे करियर आणि माझे कुटुंब यांत मला सांगड घालायची होती. माझा कल अभिनयाच्या बाजूनेच जास्त होता. पुण्यातच माझे सगळे शिक्षण झाले. त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गेले. पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूट असूनही मी तिथे गेले नाही. कारण मला सिनेमाचे आकर्षण कधीच नव्हते. मला फक्त थिएटर करायचे होते. त्याचवेळी सईद मिर्झाची 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है' हा सिनेमा माझ्याकडे आला. यांत मी, ओम पुरी, नसिरुद्दीन शहा, सतीश शाह सगळेच फ्रेशर्स होतो. त्यावेळी 'एफटीआय' आणि 'एनएसडी' ग्रुपमध्ये गप्पांचा मस्त फड रंगायचा.
 
आपण साकारलेली सगळ्यात आव्हानात्मक भूमिका कोणती?आगामी काळात कोणत्या भूमिका साकारत आहात?
 
माझ्यासाठी सगळ्यात कठीण भूमिका 'पार्टी'मधली होती. ही भूमिका निभावणे फार कठीण होते. मात्र ती मी निभावली. याशिवाय प्रत्येक भूमिकेने मला काही ना काही दिले. 'कस्तुरबा' ही भूमिका साकारल्यानंतर सगळेच विचारायचे काय बदल झाला. तर त्यावेळी मी सांगायचे की ''आय स्टार्टेड गिव्हींग नेक्सट पर्सन द थर्ड चान्स नॉट सेकंट चान्स''. प्रत्येक भूमिकेसाठी मला असेच वाटते. प्रत्येक भूमिकेला मी माझ्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करते.प्रत्येक भूमिकेतून मी काही ना काही शिकण्याचा आणि स्वतःच्या आयुष्यात घेण्याचा प्रयत्न करते.येत्या काळात 'सरकार-3', सुजय डहाकेचा सिनेमा, एक तमिळ आणि तेलुगुमध्ये एका सस्पेन्स थ्रिलर सिनेमात काम करत आहे.
Web Title: As Rohini Hattangadi says, patience is just the key to success
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.