Reena Agarwal on the set of 'What, Mr. Panchal?', A dog attack! | ‘क्या हाल,मिस्टर पांचाळ?’च्या सेटवर रीना अगरवालवर केला कुत्र्याने हल्ला!

उंच, देखणी रीना अगरवाल सध्या विलक्षण वेदनेतून जात असून डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.तिला काय झाले आहे? ‘स्टार भारत’वरील ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ मालिकेचे चित्रीकरण करीत असताना तिच्यावर एका कुत्र्याने हल्ला करून तिचा चावा घेतला होता.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याशी संबंधित एका प्रसंगाचे चित्रीकरण सुरू होते, तेव्हा ही घटना घडली. प्रेमा (रीना) रस्त्यावरच्या एका कुत्र्याला घरी घेऊन येते आणि मग तिचे कुटुंबीय त्या कुत्र्याची कशी काळजी घेतात, असा हा कथाभाग आहे. या घटनेची माहिती देताना सूत्रांनी सांगितले,“चित्रीकरणादरम्यान तो कुत्रा आक्रमक बनला आणि तो रीनाच्या चेह-या ला चावला. ही जखम अतिशय गंभीर असल्याने तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं.”विशेष म्हणजे, रीनाच्या घरी तिने कुत्रा पाळला असल्याने तिला कुत्र्यांची सवय आहे. त्यामुळे हा कुत्रा तिच्याविरुध्द कसा वागला, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. रीनाशी संपर्क साधला असता, तिने या घटनेला दुजोरा देताना सांगितले,“त्यावेळी नक्की असं काय घडलं की त्याने माझ्या चेहर्‍्याचा चावा घेतला, हे मलाही ठाऊक नाही. त्याने माझ्या उजव्या डोळ्याखाली चावा घेतला. मी तात्काळ कोकिळाबेन रुग्णालय गाठलं, तेव्हा डॉक्टरांनी मला टाके घालण्याचा सल्ला दिला. मी काही इंजेक्शनं घेतली असून मला आणखी काही इंजेक्शनं घ्यायची आहेत. आता चार दिवस झाले, मी चित्रीकरण करीत नाहीये. ही जखम पूर्ण भरण्यास निदान एक महिना जाईल.”“माझ्या घरी गोल्डन रीट्रीव्हर जातीचा कुत्रा आहे. त्यामुळे कुत्र्यांना कसं हाताळायचं, याची मला कल्पना आहे. म्हणूनच या कुत्र्याला माझ्यावर हल्ला करण्यासारखं काय झालं, याचं मला आश्चर्य वाटत आहे. कदाचित त्यावेळी सेटवर फारच माणसं होती, त्यामुळे तो त्रासून गेला असावा.चित्रीकरण करताना अशा गोष्टी नेहमी घडतात, असं मला वाटतं.एक अभिनेत्री म्हणून मी सर्व प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहिजे,” असे रीना म्हणाली.
Web Title: Reena Agarwal on the set of 'What, Mr. Panchal?', A dog attack!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.