For this reason, Remo D'Souza is currently doing very little choreography in the film | या कारणामुळे सध्या रेमो डिसोझा चित्रपटात कोरिओग्राफी खूपच कमी करत आहे

रेमो डिसोझा आज एक डान्सर, कोरिआग्राफर, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका पार पाडत आहे. डान्स प्लस या त्याच्या कार्यक्रमाचे गेले दोन सिझन चांगलेच गाजले आहेत. या कार्यक्रमाचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

बाजीराव मस्तानी, ये जवानी है दिवानी यांसारख्या अनेक चित्रपटातील तुझ्या कोरिओग्राफीची नेहमीच चर्चा झाली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून तू खूपच कमी चित्रपटात कोरिओग्राफी करत असल्याचे पाहायला मिळत आहे, याचे काही खास कारण आहे का?
मी सध्या दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, कोरिओग्राफर अशा विविध भूमिका पार पाडत आहे. मी सध्या माझ्या कामात प्रचंड व्यग्र असल्याने मला तितकासा वेळ कोरिओग्राफीला देता येत नाही. पूर्वी मी अनेक गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. पण आता माझ्या मनाला स्पर्शून जाईल अशाच गाण्यांची कोरिओग्राफी करायची असे मी ठरवले आहे. मी सध्या चोखंदळपणे गाणी निवडत आहे.

तू आगामी काळात दोन चित्रपटांची निर्मितीदेखील करत आहेस, निर्मितीक्षेत्राकडे वळण्याचे तू कसे ठरवले?
चित्रपटाची निर्मिती करायची असे कित्येक दिवसांपासून माझ्या डोक्यात सुरू होते. पण मोठी उडी न मारता सुरुवातीला छोट्या बजेटच्या चित्रपटांची निर्मिती करायची असे मी ठरवले. राघव जुयाल, धर्मेश येलंडे आणि पुनित पाठक यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या नवाबजीद या चित्रपटाची मी निर्मिती करत आहे तर माझ्या दुसऱ्या चित्रपटात शक्ती मोहन आणि सलमान युसूफ खान प्रमुख भूमिकेत आहेत. नवाबजीद या चित्रपटाचे अर्धे चित्रीकरण देखील पूर्ण झाले आहे.

डान्स प्लस या कार्यक्रमाचा हा तिसरा सिझन आहे, या तिसऱ्या सिझनचे वेगळेपण काय असणार आहे?
प्रत्येक सिझनमध्ये नवीन स्पर्धक आणि त्यांचा नृत्यप्रकारे हे वेगळे असते असे मला वाटते. डान्स प्लस या कार्यक्रमात आतापर्यंत प्रेक्षकांना केवळ भारतीय डान्सर पाहायला मिळाले होते. पण यंदाच्या सिझनमध्ये अनेक पाश्चिमात्य देशातील डान्सर हजेरी लावणार आहेत. भारतीय डान्सचा मुकाबला त्यांच्यासोबत असणार आहे. अनेक प्रसिद्ध डान्सर यंदांच्या सिझनमध्ये दिसणार आहेत.

तू आज एक अभिनेता, डान्सर, दिग्दर्शक, निर्माता, कोरिओग्राफर अशा अनेक भूमिका साकारत आहेस, तू यामधील कोणती भूमिका सगळ्यात जास्त एन्जॉय करतो?
मला फिल्म मेकिंग खूप आवडते. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, डान्स, कोरिओग्राफी या सगळ्याच गोष्टींचा संबंध फिल्म मेकिंगशी आहे असे मला नेहमीच वाटते. त्यामुळे मी या सगळ्याच गोष्टी खूपच एन्जॉय करतो. 
Web Title: For this reason, Remo D'Souza is currently doing very little choreography in the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.