Rachel Rao and I will be involved in a marriage next year: Keith Siquera | रोचेल राव आणि मी पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार ः किथ सिक्वेरा

किथ सिक्वेराने बिग बॉस, सुपर फाइट लीग या रिअॅलिटी शोमध्ये काम केले होते. तो आता लव्ह का है इंतजार या मालिकेत झळकणार असून या मालिकेत तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्याच्या या मालिकेबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

अनेक रिअॅलिटी शो केल्यानंतर आता तू लव्ह का है इंतजार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेस. तू मालिकेत काम करण्याचा विचार कसा केलास?
बिग बॉस या कार्यक्रमामुळे मला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या आधी मी काही चित्रपटदेखील केले होते. त्यामुळे एखाद्या मालिकेत काम करायचे असे माझ्या कित्येक दिवसांपासून डोक्यात सुरू होते. मला या मालिकेची कथा ऐकवण्यात आली त्यावेळी ही कथा ऐकताच मी या कथेच्या प्रेमात पडलो आणि ही मालिका ठरावीक भागांची असल्याने ही कुठेही भरकटणार नाही याची मला कल्पना असल्याने ही मालिका करण्याचे मी ठरवले. खरे तर गेल्या वर्षीच मी ही मालिका करणार असे ठरले होते. जवळजवळ सहा ते आठ महिने या मालिकेची टीम या मालिकेच्या कथानकावर काम करत होती.

रिअॅलिटी शो आणि मालिका यांमध्ये तू जास्त काय एन्जॉय करत आहेस?
मी शाळेत, कॉलेजमध्ये असताना अनेक नाटक, चित्रपट यात काम केलेले आहे. त्यामुळे अभिनय ही माझी कधीही पहिली आवड आहे. त्यामुळे मालिका असो अथवा चित्रपट असो त्यात काम करायला मला खूप आवडते आणि त्यात मालिका ही ठरावीक भागांची असल्यास तुम्हाला इतर गोष्टींचेदेखील प्लानिंग करता येते. त्यामुळे सध्या तरी मालिका करणे मी अधिक एन्जॉय करत आहे.

तू आणि रोचेल राव गेल्या कित्येक वर्षांपासून नात्यात आहात, या वर्षात लग्न करण्याचा तुमचा काही विचार आहे का?
लव्ह का है इंतजार ही मालिका वर्षभर तरी सुरू राहाणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून तर या मालिकेच्या चित्रीकरणातच व्यग्र आहे. मला रोचेलला सध्या भेटायलादेखील वेळ मिळत नाही. कारण तीदेखील तिच्या कामात व्यग्र असल्याने आमच्या वेळाच जुळून येत नाहीयेत. त्यामुळे यावर्षी तरी लग्न करण्याचा विचार नाही. बहुधा आम्ही पुढच्या वर्षी लग्न करू.

सध्याच्या मालिकांबद्दल तुझे काय मत आहे?
एखादी मालिका प्रेक्षकांना आवडत असेल तर त्या मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांच्या मागणीनुसार वळण दिले जाते. एखाद्या ट्रॅकला जास्त टिआरपी आहे असे लक्षात आले तर तो ट्रॅक मालिकेत अधिक काळासाठी दाखवला जातो. त्यामुळे कोणतीही मालिका अनेक वर्षं सुरू असेल तर ती उगाचच नव्हे तर प्रेक्षकांमुळे सुरू असते असे मला वाटते. 
Web Title: Rachel Rao and I will be involved in a marriage next year: Keith Siquera
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.