The platform to express the 'Big Boss' thought | ‘बिग बॉस’ विचार व्यक्त करण्याचे व्यासपीठ

वीरेंद्र जोगी 

सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुुटुंबातील मुलीने मॉडेलिंगसारख्या ग्लॅमरस क्षेत्रात काम करणे, वाटते तितके सोपे नाहीच. पण आपले सौंदर्य आणि बुद्धीच्या बळावर नागपुरच्या लोपामुद्रा राऊत हिने हे करून दाखवले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेता घेता लोपामुद्राने मॉडेलिंगमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि प्रचंड चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा निर्णय तडीसही नेला.  हीच लोपामुद्रा लवकरच ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार आहे. सलमान खानच्या ‘बिग बॉस 10’ मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांत लोपामुद्राचा समावेश आहे. ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री करण्यापूर्वी लोपामुद्राने सीएनएक्सशी संवाद साधला. तिच्याशी मारलेल्या गप्पा, तिच्याच शब्दांत..

प्रश्न : तुझ्या मॉडेलिंगची सुरुवात कशी झाली? 
लोपामुद्रा : ज्या दिवशी ‘मिस इंडिया’साठी आॅडिशन होते त्याच दिवशी माझी परीक्षा होती. मी परीक्षा हॉलमध्ये पोहोचल खरे. पण पेपर न देता मी आॅडिशनला जाण्याचा निश्चय घेतला. मला अभियंता व्हायचे नाहीयं. माझे जग वेगळेच आहे, याचा साक्षात्कार जणु मला त्याक्षणाला झाला. अर्थात माझ्या या निर्णयाला घरातून विरोध झाला. मला मार्गदर्शन करायला कुणीही नव्हते. लहान शहरांतील मुली ‘फॅशन’ जगतात टिकूच शकत नाही, असा समज होता. पण मी हा समज मोडून काढला आहे. लहान शहरांमधील तरुणींमध्येही प्रचंड क्षमता आहे, हे मी सिद्ध केले.

प्रश्न : तुला घरून विरोध झाला, असे तू म्हणाली. हा विरोध आत्ताही कायम आहे का? 
लोपामुद्रा : नाही, आता तसले काहीच राहिलेले नाही. मी मॉडेलिंग करावी, ही माझी निवड होती. घरून विरोध होणार, याची थोडी फार जाणीव होतीच. मात्र हा विरोध लवकरच मावळला. मी मिळवलेल्या यशाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर सर्व सुरळीत झाले. नागपुरकरांनी मला खूप साथ दिली. यामुळे मी नागपुरकरांची मी नेहमीच आभारी राहील. प्रश्न : विविध सौंदर्य स्पर्धात तू सहभागी झालीस, हा अनुभव कसा होता? 
लोपामुद्रा : माझी पहिली स्पर्धा मिस इंडिया होती. मी नवीन होते, शिवाय मार्गदर्शन करणारे कुणीच नव्हते. सुमारे 22 स्पर्धकांना मागे टाकत मी अंतिम तीन स्पर्धकांत स्थान मिळविले. यानंतर अनेक स्पर्धात सहभागी झाले. मिस इंडिया गोवा या स्पर्धेचे विजेतपद मिळविले. ‘यामाहा फॅसिनो कॅलेंडर गर्ल’ म्हणून माझी निवड झाली. या सर्व स्पर्धांत  लोपामुद्रा असाच माझ्या नावाचा उल्लेख झाला. पण इक्वाडोरमध्ये झालेल्या मिस युनायटेड कॉन्टिनेंटल या स्पर्धेत सहभागी झाल्यावर मला ‘मिस इंडिया’ या नावाने हाक मारली गेली तेव्हा मला स्वत:चा अभिमान वाटला. 

प्रश्न : सौंदर्य स्पर्धात सहभागी होताना तुझ्या मनात काय असायचे? 
लोपामुद्रा :  मिस युनायटेड कॉन्टिनेंटलमध्ये सहभागी झाल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संस्कृतीची ओळख जपण्यावर मी भर दिला. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतरदेखील दडपण होतेच. परंतु आत्मविश्वासच माझ्या कामी आला. कोणताही न्यूनगंड न बाळगता समोर जायलाच हवे. स्वत:तील काही त्रूटी दूर सारून  स्वप्नांचा ध्यास घ्यायला हवा.

प्रश्न : सौदर्य स्पर्धांनंतर थेट ‘बिग बॉस’च्या घरात शिरताना तुझ्या मनात काय चालले आहे? 
लोपामुद्रा : मी आतापर्यंत केवळ सौंदर्यस्पर्धांत सहभागी झाले आहे. अर्थातच हे माझ्यासाठी नवीन आहे. मी कधी ‘बिग बॉस’ची स्पर्धक असेल असे मला वाटले नव्हते. काही वर्षांपूर्वी माझ्या मैत्रिणीने  तू ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होशील का?’असा प्रश्न केला होता. आज मला तिची आठवण होते आहे. ही माझ्यासाठी मोठी परीक्षा आहे. इक्वाडोरमधून भारतात परत आल्यावर मी ‘बिग बॉस’च्या अधिकाºयांशी भेटले. तेव्हापासून आतापर्यंत ही उत्सुकता कायम आहे.

प्रश्न : ‘बिग बॉस’च्या घरात जाताना काही दडपण जाणवते आहे का? 
लोपामुद्रा : घरात बसून राहणे मला कधीच जमले नाही. कॉलेजपासूनच मी लोक ासमोर परफार्म करीत आलेयं. मला लोकांत मिसळून राहायला आवडते. आता ‘बिग बॉस’च्या घरात राहणे,म्हणजे जगाशी संपर्क तुटणार. पण तरी कुणीतर आपल्यावर वॉच ठेऊन आहे, याची जाणीव मनात ठेवायची आहे. आपले विचार लोकांसमोर मांडण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, असे मला वाटू लागले आहे. शिवाय माझी सलमान खानसोबत भेटण्याची इच्छा देखील पूर्ण होणार आहे. ही भेट नुसतीच भेट नसेल तर त्याच्याकडून बरेच काही शिकताही येणार आहे. 


Web Title: The platform to express the 'Big Boss' thought
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.