Nana Patekar in Star Plus's Adbhut ganeshotsava | ‘स्टार प्लस’वरील ‘अद्भुत गणेशोत्सवा’त नाना पाटेकर
‘स्टार प्लस’वरील ‘अद्भुत गणेशोत्सवा’त नाना पाटेकर

गणेश चतुर्थी आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली असून गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळे आतुरतेने वाट पाहात आहेत. गणेशोत्सवाची जोरदार तयारी सगळीकडे सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्टार प्लस वाहिनीवर एक खास कार्यक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना गणेशोत्सव या सणाचा आनंद घरबसल्या घेण्याची सोय ‘स्टार प्लस’ वाहिनीने केली आहे. या वाहिनीने भव्य सेट, नामवंत व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असलेल्या आगळ्या कार्यक्रमाचे आयोजन ‘अद्भुत गणेशोत्सव’ नावाने केले आहे. या कार्यक्रमात आजवर टीव्हीवरील कार्यक्रमात कधीच न दिसलेला कसदार अभिनेता नाना पाटेकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नाना पाटेकर गेली अनेक वर्षं मराठी चित्रपट, हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आहेत. त्यांनी आज बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे एक स्थान निर्माण केले आहे. मोठ्या पडद्यावर त्यांनी आपली जादू पसरवली असली तरी त्यांनी कधीच छोट्या पडद्यावर काम केले नाही. पण ‘अद्भुत गणेशोत्सव’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना छोट्या पडद्यावर पाहायची संधी त्यांच्या फॅन्सना मिळणार आहे.

नाना पाटेकर या दर्जेदार अभिनेत्याची गणपतीवर दृढ श्रद्धा असून दरवर्षी ते आपल्या घरी गणपतीची मूर्ती बसवतात. त्यांच्या गणपतीला सेलिब्रेटीच नव्हे तर सामान्य लोक देखील मोठ्या संख्येने हजेरी लावतात. गणपतीच्या समोरील फुलांची आरास देखील ते स्वतः करतात. गणपतीच्या विसर्जनला देखील ते उपस्थित असतात. ‘अद्भुत गणेशोत्सव’ या कार्यक्रमात नाना पाटेकर आपल्या घरातील गणपतीची आरती करताना तसेच खास या कार्यक्रमासाठी त्यांनी केलेले श्लोकस्तवन करताना दिसणार आहेत. 

आपल्या दमदार आणि अस्खलित आवाजात गणपतीची आरती आणि मंत्रपठण करणाऱ्या नाना पाटेकर यांचे एक वेगळेच रूप या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे.

‘अद्भुत गणेशोत्सव’ हा कार्यक्रम गणेशोत्सवाच्या दरम्यान म्हणजेच 10-14 सप्टेंबरदरम्यान प्रेक्षकांना  ‘स्टार प्लस’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागांमध्ये प्रेक्षकांना वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या बाप्पांना पाहण्याची संधी मिळणार आहे. 


Web Title: Nana Patekar in Star Plus's Adbhut ganeshotsava
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.