marathi-bigg-boss-fame-anil-thatte-say-will-not-to-go-usha-nadkarnis-house | अनिल थत्तेंनी ह्या कारणामुळे भाऊबीजेसाठी उषा नाडकर्णींकडे न जाण्याचा घेतला निर्णय
अनिल थत्तेंनी ह्या कारणामुळे भाऊबीजेसाठी उषा नाडकर्णींकडे न जाण्याचा घेतला निर्णय

ठळक मुद्देबहीण भावाचे नाते निरर्थक आणि एकतर्फी ठरते -अनिल थत्ते

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉसचे मराठीमधील पहिले पर्व काही दिवसांपूर्वी पार पडले. या शोमध्ये मराठी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार मंडळी सहभागी झाली होती. या कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि अनिल थत्ते यांनी बिग बॉसच्या घरात राहून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. घरात कायम तू तू-मैं मैं करणाऱ्या जोडीचे एकमेकांशी कधीच पटले नाही. इतकेच नाही तर शो संपल्यानंतरही हे दोघे संधी मिळाली की एकमेकांविषयीचा राग व्यक्त करत असतात. भलेही उषा नाडकर्णींसोबत पटले नाही तरी अनिल थत्ते यांनी त्यांना बहिण मानले आहे. या नात्याने ते यंदाच्या भाऊबीजेला उषा नाडकर्णी यांच्या घरी जाऊन सेलिब्रेट करणार असल्याचे वारंवार सांगत होते. मात्र आता त्यांनी उषा नाडकर्णींकडे न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अनिल थत्ते याबद्दल सांगितले की, बिग बॉस शो दरम्यान आणि नंतरही मी कायम ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या माझ्या मानलेल्या भगिनी आहेत आणि मी भाऊबिजेला या नात्याचा सन्मान आणि पवित्रता जपण्यासाठी उषाताईंच्या घरी जाईन, असे वारंवार आवर्जून सांगितले होते.  मी आजही त्या नात्याचा अवमान किंवा अधिक्षेप होईल असे कटाक्षाने वागत-बोलत नाही. माझी यंदा उषाताईंकडे भाऊबिजेला जाण्याची प्रामाणिक इच्छा होती. मात्र आता हा निर्णय मी बदलला आहे. 
त्यांनी पुढे सांगितले की, बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर उषाताईंनी दिलेल्या प्रत्येक मुलाखतीत मला शिव्यांची लाखोली वाहिली आहे. मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत माझे नाव घेतल्यावर त्यांनी चक्क चप्पल काढून मारण्यासाठी उगारून दाखवली. या पार्श्वभूमीवर उषा नाडकर्णी यांच्याशी मी मानीत असलेले बहीण भावाचे नाते निरर्थक आणि एकतर्फी ठरते. त्यामुळे मी भाऊबीजेसाठी उषा नाडकर्णी यांच्याकडे जाणार नाही.
आता अनिल थत्ते यांच्या निर्णयावर उषा नाडकर्णी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.


Web Title: marathi-bigg-boss-fame-anil-thatte-say-will-not-to-go-usha-nadkarnis-house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.