Mansi Sahariya said, this forum taught me a lot of things | मानसी साहारियाने सांगितले, या मंचाने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या

आसाममधील छोट्याशा जिल्ह्यातून आलेल्या मानसीने आपल्या आईला गुणगुणताना ऐकून वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गायला सुरुवात केली. तेव्हापासून तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. मात्र तिच्या शहरात तिला हिंदी संगीतामध्ये प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देऊ शकेल असे काही सापडणे फारच कठीण होते. तरीही तिने हार मानली नाही आणि मानसीने ऑनलाईन हिंदी व्हिडिओज ऐकून आणि पाहून आपल्या गाण्याच्या कौशल्यामध्ये सुधारणा करायला सुरुवात केली. द व्हॉईस इंडिया किड्समध्ये मानसीला सहभागी होता यावे आणि मुंबईला जाता यावे यासाठी तिच्या गावातील ३०० लोकांनी एकत्र येऊन तिच्यासाठी पैसे जमवले. 

विजेती म्हणून जेव्हा तुझ्या नावाची घोषणा झाली तेव्हा तुझी सर्वात पहिली प्रतिक्रिया काय होती?
त्या क्षणी मी रडायला लागले. माझे नाव घोषित झाल्याचे ऐकताच माझा आनंद गगनात मावत नव्हता.

शो मध्ये तुझ्या प्रवासाचा मुख्य भाग काय होता असे वाटते?
मी याआधी कधीही हिंदी गाणी गायले नाही. मी जेव्हा ऑडिशन दिली तेव्हा मला फक्त ६-७ गाणीच येत होती. मी ऑडिशनदेखील पार करेन की नाही याचीदेखील मला खात्री नव्हती. पण, मी या शो मध्ये आले आणि एलिमिनेशन चालू झाले तेव्हा मी स्वतःच्या परफॉर्मन्सचा नीट विचार करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मी शोमध्ये नक्कीच टिकून राहू शकेन हा आत्मविश्वास निर्माण झाला. मायक्रोफोन कसा नीट धरायचा हे मी शिकले. मला आधी हिंदी नीट बोलता येत नव्हते, पण आता मी बोलू शकते. माझा आत्मविश्वास वाढविण्यासाठी या शोने मला खूप मदत केली आहे.

तुझ्या विजयाचे श्रेय तू कोणाला देशील?
माझ्या विजयासाठी मला खूप लोकांचा आभार मानायचे आहेत. सर्वात पहिले तर माझ्या गावातील प्रत्येकजण, माझे पालक आणि माझे मित्रमैत्रिणी ज्यांनी मला ऑडिशनला जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच माझे मार्गदर्शक आणि मी स्टेजवर कसे गाणे म्हणावे, परफॉर्म करावे, माईक कसा धरावा इ. सगळे प्रशिक्षण देणारा प्रत्येकजण यांची मी आभारी आहे. त्या सर्वांनाच
मला धन्यवाद द्यायचे आहेत.

तुझ्या या प्रवासात तुला मार्गदर्शकांची कशी मदत झाली? 
मार्गदर्शक पलक यांनी मला खूपच मदत केली. मी आयुष्यात यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अशा मॉलमध्येसुद्धा त्या मला घेऊन गेल्या होत्या. त्यांनी मला नेहमी धीट राहायला शिकवले आणि स्वतःबद्दल कधीही नकारात्मक विचार करू नये हेदेखील शिकविले. 


शोमध्ये शिकलेली एखादी गोष्ट सांग 
गाण्याव्यतिरिक्त मी बरेच काही शिकले, स्टेजवर कसे परफॉर्म करावे यापासून ते आवाजातील चढउतार आणि हावभावापर्यंत सगळे शिकले. लोकांशी कसे वागावे बोलावे हेदेखील मला पलक मॅमकडून शिकायला मिळाले. ही सर्व शिकवणूक मला आयुष्यभर उपयोगी पडेल.

पलकविषयी तुला काय वाटते?
पलक मॅमने केलेली सर्व मदत आणि पाठिंब्यासाठी मला त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. त्या त्यांच्या कामात कितीही व्यस्त असल्या तरीही त्यांनी नेहमीच माझे कॉल घेतले आणि माझ्या मेसेजनादेखील उत्तरे दिली. माझ्या सर्व परफॉर्मन्ससाठी मला नेहमीच मार्गदर्शन केले. माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल आणि मला त्यांचीच मुलगी मानल्याबद्दल मला त्यांच्या आईवडिलांचेदेखील आभार मानायचे आहेत.

Web Title: Mansi Sahariya said, this forum taught me a lot of things
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.