'Make life prosperous' - Mohit Malik | ‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक

अबोली कुलकर्णी 

टीव्ही इंडस्ट्रीतील हॅण्डसम हंक अभिनेता मोहित मलिक स्टार प्लस वाहिनीवरील ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या मालिकेत सिकंदरच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. छोट्या पडद्यावर त्याने अनेक मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोजमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘अभिनयावर अवलंबून न राहता स्वत:मधील वेगवेगळया प्रकारचे गुण तपासून पाहा. नवनवीन गोष्टी शिका, जेणेकरून तुम्ही एक अभिनेता म्हणून समृद्ध व्हालच त्यासोबतच तुम्ही एक व्यक्ती म्हणूनही समृद्ध व्हाल.’ असा संदेश देत मोहित मलिक याने सीएनएक्स मस्तीसोबत दिलखुलासा गप्पा मारल्या.

* तीन वर्षांनंतर तू ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या मालिकेतून कमबॅक करत आहेस. याविषयी आणि सिकंदरच्या व्यक्तिरेखेविषयी काय सांगशील?
- ‘झलक दिखला जा ’ आणि ‘नच बलिए सीझन ४’ नंतर बऱ्याच आॅफर्स येत होत्या. पण, मनाला रूचेल अशी एकही व्यक्तिरेखा माझ्याकडे येत नव्हती. अशाच काहीशा परिस्थिीतीत मी ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या मालिकेविषयी ऐकले. त्यातले सिकंदर ही व्यक्तिरेखा जर मला करायला मिळाली तर मजा येईल, असे मला वाटले. तुम्हाला नवल वाटेल पण, मी ही व्यक्तिरेखा करायला मिळावी म्हणून मी प्रत्येक प्रयत्न केले. मला ही भूमिका प्रचंड आवडली. त्यातील तरूण सिकंदर साकारणं माझ्यासाठी आव्हान होतं. पण, मी माझ्या भूमिकेवर प्रेम करत अभिनय साकारला. 

* भूमिकेसाठी काही नव्या गोष्टी तू शिकल्या आहेस. यामुळे मोहितमध्ये काही बदल झाला का? 
- होय, मी भूमिकेसाठी गाणं शिकतो आहे. त्यामुळे साहजिकच मला या गायनाचा माझ्या व्यक्तिगत आयुष्यात फायदाच होणार आहे. त्यासोबतच मी पंजाबी भाषा, गिटार वाजवणं शिकतो आहे. या सगळ्या गोष्टी सिकंदरसोबतच मोहितसाठी देखील महत्त्वाचा बदल घडवणारी आहे. या गोष्टी शिकण्यामुळे माझं व्यक्तिमत्त्व समृद्ध होणार आहे. 

* स्टार प्लसच्या ‘मिली’ या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला आहेस. यापूर्वीचे आयुष्य आणि स्ट्रगल याविषयी काय सांगशील?
- प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात जसा एक स्ट्रगलिंग काळ असतो तसाच माझ्याही आयुष्यात होता. खरंतर याच स्ट्रगलिंग लाईफमधून व्यक्तीला खूप काही शिकायला मिळते. ‘जे होतं ते चांगल्यासाठीच’ हे तत्त्व उराशी बाळगत मी माझं काम करत असतो. मला असं वाटतं की, एका कलाकाराचं आयुष्य हे खूप आव्हानात्मक असतं. शारिरीक फिटनेससोबतच मानसिक फिटनेसही तितकीच महत्त्वाची असते. त्यासोबतच प्रेक्षक आपल्याला कितपत स्विकारतील? हे देखील कलाकारावर एक दडपणच असते. त्यामुळे अभिनेता होण्यापूर्वीचे आणि आत्ताचे आयुष्य मी एन्जॉय करतोय, करत राहीन.

* ‘झलक दिखला जा’ आणि ‘नच बलिए के सीझन ४’ मध्ये तू कंन्टेस्टंट होतास. तुला काय वाटते की, रिअ‍ॅलिटी शोमधून खरं टॅलेंट बाहेर येते का?
- मला असं वाटतं की, होय रिअ‍ॅलिटी शोमधून खरं टॅलेंट जगासमोर येते. कालपर्यंत जो चेहरा आपल्यासाठी अनोळखी होता तो अचानकच आपलासा होऊन जातो. आता माझ्याबद्दल सांगायचं झालं तर, मोहित कसा आहे? त्याची आवड? त्याचा डान्सप्रकार? या सर्व गोष्टी आपल्या फॅन्ससाठी महत्त्वाच्या ठरतात. सेलिब्रिटींचे फॅनफॉलोर्इंग वाढते, समाजात सगळे ओळखू लागतात, कलाकारालाही स्टारडम जगायला मिळते. त्यामुळे रिअ‍ॅलिटी शो हे समाजातील चांगले टॅलेंट बाहेर आणू शकतात. 

* अभिनयाची तुझी व्याख्या काय?
- अभिनय म्हणजे एखाद्या व्यक्तीची मानसिकता जगणे. तो व्यक्ती आपण स्वत: आहोत, या भावनेने त्याचे संपूर्ण भावविश्व, त्याचे प्रेम, इच्छा, अपेक्षा यांसोबत जगणे. खरंतर एका आयुष्यात अनेक व्यक्तींचं जीणं जगायला मिळत असेल आणि त्यामुळे पैसा, प्रसिद्धी मिळत असेल तर यापेक्षा दुसरी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट ती कोणती? फक्त एवढंच की, या सर्वांसाठी जी मेहनत, सातत्य आणि कष्ट घ्यावे लागतात ते कलाकार म्हणून आम्ही घेतोच. 

* तू  कोणत्या स्टारला तुझी अ‍ॅक्टिंग मोटिवेशन मानतोस?
- इरफान खान. या व्यक्तीला मी माझी अ‍ॅक्टिंग मोटिवेशन मानतो. कामाप्रती जिद्द, समर्पण भाव आणि अभिनयातील जाण या सर्व गोष्टी मी कायम त्याच्याकडून शिकलो आहे. 

* इंडस्ट्रीतील स्ट्रगलर्सना तू कोणता संदेश देशील?
- सध्या इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या  स्टगलर्सना मी हेच सांगेन की, केवळ अभिनयावर अवलंबून राहू नका. त्यासोबतच दिग्दर्शन, निर्मिती या क्षेत्रातही नाव कमवा. जेव्हा तुम्ही तुमच्यातील वेगवेगळे गुण तपासून पाहाल तेव्हाच तुमच्या आयुष्याला काही अर्थ प्राप्त होईल. कष्ट करत रहा, मेहनत करा, नवनवीन गोष्टी शिकत राहा. आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा.

Web Title: 'Make life prosperous' - Mohit Malik
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.