Madhuri Dixit, Swapnil Joshi to commentary in Marathi, commentary from Marathi | ​आयपीएलच्या सामन्याचे माधुरी दीक्षित, स्वप्निल जोशी करणार मराठीतून समालोचन

सध्या देशात सर्वाधिक चर्चा आहे ती आयपीएल २०१८ ची... यंदाच्या पर्वात अंतिम फेरीचे दावेदार कोण ठरणार आणि कोण बाजी मारणार याची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी स्टार प्रवाहकडून एक खुशखबर आहे. VIVO IPL चा २७ मे रोजी होणारा अंतिम सामना प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना मराठी समालोचनासह दाखवला जाणार आहे. कारण, खरी मजा तर आपल्या भाषेतच आहे. विशेष म्हणजे अंतिम सामन्याच्या आधी होणाऱ्या खास कार्यक्रमात डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षित आणि अभिनेता स्वप्नील जोशी सहभागी होणार आहेत.
मराठी भाषा आणि क्रिकेट या दोन्हीची प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागा आहे. आता VIVO IPL २०१८ च्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने या दोन्ही गोष्टी एकत्र येणार असल्याने त्याचा भाग होण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मराठी माणसांना पहिल्यांदा क्रिकेट सामन्याचे समालोचन मराठीतून ऐकण्याची संधी मिळणार आहे. मला खात्री आहे, क्रिकेट आणि मराठी भाषेच्या जल्लोषात प्रेक्षकही नक्की सहभागी होतील आणि आयपीएल आणखी एक पाऊल पुढे टाकेल, अशी भावना स्वप्निल जोशीने व्यक्त केली.
अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी सहा वाजल्यापासून खास कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमात माधुरी दीक्षित आणि स्वप्निल जोशी सहभागी होणार आहेत. त्यानंतर मराठी समालोचनासह अंतिम सामन्याचा आनंद घेता येईल. संदीप पाटील, सुनंदन लेले आणि चंद्रकांत पंडित यांच्या खुमासदार शैलीने अंतिम सामन्याची रंगत वाढणार आहे. त्यामुळे मराठीतून अंतिम सामना पाहण्याची ही दुर्मिळ संधी प्रेक्षकांना स्टार प्रवाह वाहिनी देत आहे. VIVO IPL २०१८ चा अंतिम सामना पहा २७ मे रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
माधुरी दीक्षित प्रेक्षकांना बकेट लिस्ट या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असून स्वप्निलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रणांगण या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 

Also Read : स्वप्निल जोशीने सध्या कामातून काही दिवसांचा ब्रेक घेतला असून अशाप्रकारे कुटुंबियांसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे...
Web Title: Madhuri Dixit, Swapnil Joshi to commentary in Marathi, commentary from Marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.