सतीश डोंगरे
महाराष्ट्रात वसलेले एक लहानसे हिल स्टेशन लोणावळा आपल्या नॅचरल ब्यूटीसाठी ओळखले जाते; मात्र गेल्या काही वर्षांपासून या शहराची ओळख ‘बिग बॉस’चे घर अशी झाली आहे. कारण निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या आलिशान बिग बॉसच्या घराने प्रेक्षकांना भलतेच वेड लावले आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रिटिजच्या दैनंदिन सवयी, त्यांचा स्वभाव, आवडी-निवडी प्रेक्षकांना घरबसल्या बघावयास मिळत असल्याने हा शो ऐतिहासिक दहाव्या सीझनमध्ये पदार्पण करू शकला. सद्यस्थितीत हा शो प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत असून, या आलिशान घराविषयी प्रत्येकांमध्येच आकर्षण आहे; मात्र घरातली वाट आपण बघतो तेवढी नक्कीच सोपी नाही, आव्हान अन् मानसिक क्षमतेची कसोटी पाहणाºया या घरात प्रस्तुत प्रतिनिधीने एक दिवस वास्तव्य केले. या प्रत्यक्ष अनुभवाचा घेतलेला हा आढावा...


आकर्षक सेट आणि अतिशय कलात्मक पद्धतीने सजविलेल्या या घरातील हवा घरातील सदस्यांना पावलो-पावली वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी खुणावत असते. ज्या पद्धतीने घराची रचना आहे, त्यावरून पहिल्याच दिवसापासून तुम्हाला ‘गेम’ खेळावाच लागतो. कारण घराच्या आकर्षक सजावटीपेक्षा त्याची रचना गेम खेळण्यास भाग पाडते. किचन, हॉल आणि बेडरूम हे समोरासमोरच असल्याने प्रतिस्पर्धी सदस्यांना एकमेकांचा पावलोपावली मुकाबला करावाच लागतो. त्यातच घरात तब्बल १४ सदस्य वास्तव्य करीत असल्याने अन् बिग बॉसच्या भारदस्त आवाजात ‘जब तक आप बिग बॉस के घर मे हो तब तक आप अपना घर समझके रहिये’ या सूचना वजा फर्मानमुळे घरातील वातावरण अक्षरश: ढवळून निघते. ना मोबाइल, ना टीव्ही, ना सोशल मीडिया अशा जगाशी संबंध नसलेल्या वातावरणात वावरणे हे खरोखरच आव्हानात्मक आहे. 


खरं तर घरात प्रवेश केल्यानंतर एकमेकांशी ओळख निर्माण करणे हा केवळ ‘फॉर्म्यालिटी’चा भाग ठरतो. कारण घरातील सदस्यांकडे कुठलेही मनोरंजनाचे (मोबाइल, टीव्ही) साधन नसल्याने त्यांना इतर सदस्यांविषयी विचार करण्याशिवाय गत्यंतर नसते. त्यातूनच वाद, द्वेष, मत्सर, अफेयर्स निर्माण होतात. आश्चर्याची बाब म्हणजे यातूनच घरातील सेलिब्रिटी सदस्यांना प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन पोहचविले जात असल्याने ‘बिग बॉस’चे आलिशान घर जादूई नगरीपेक्षा कमी नाही, हे निश्चित. 


दहावा सीझन व्हेरी व्हेरी स्पेशल
‘बिग बॉस’ शोचा दहावा सीझन व्हेरी व्हेरी स्पेशल करण्यासाठी खास तयारी करण्यात आली आहे. घराची सजावट या पूर्वीच्या सीझनच्या तुलनेत अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे. घराला मेडिटोरियन फील आणण्यासाठी अधिकाधिक रंगांचा वापर केला गेला आहे. घरात प्रवेश करताच सेलिब्रिटीजना स्वच्छ आकर्षक पुलाबरोबरच उजव्या बाजूला जिमचे साहित्य ठेवलेले दिसणार आहे. त्यालाच लागून एक कस्टडी रूम असल्याने त्यात जाण्याचे फारसे कोणी धाडस करणार नाही. कारण ही रूम खरोखरच्या कस्टडी रूमसारखी दिसावी यासाठी विचित्र पद्धतीने रंगविण्यात आली आहे. हिरव्यागार लॉन्स अर्थात आर्टिफिशियल लॉन्सवर ठेवण्यात आलेल्या खुर्च्या बघून मन प्रसन्न होते. घराची बैठक रूम अतिशय सुरेख पद्धतीने सजविली आहे. तिथे असलेल्या टीव्हीमध्ये शोचा होस्ट सलमान खान याचा चेहरा केव्हा दिसेल, याची आतुरता लागल्याशिवाय राहत नाही. 


बिग बॉसचा कन्फेशन रूम भव्य आणि शाही अंदाजात दाखविण्यात येणार आहे. किचनचीही अतिशय आकर्षक पद्धतीने सजावट केलेली आहे. बेडरूममध्ये दोन्ही बाजूला ठेवण्यात आलेले बेड आणि मधोमध असलेला सोफा बेडरूमची भव्यता दर्शवितात. यावेळी घराला लाल, पिवळ्या, जांभळ्या रंगाची शेड दिली असल्याने घराचे रुपडे आणखीनच खुलून दिसत आहे. 

Web Title: Learn ... How is Big Boss home?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.