In the 'Kaun Banega Crorepati' show, the secret of Big B's 'Computer G' has been revealed, these things appear on the computer screen! | ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये बिग बींच्या ‘कॉम्प्युटर जी’चे रहस्य उलगडलं,कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसतात या गोष्टी!

छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती हा शो आणि महानायक अमिताभ बच्चन हे जणू समीकरण बनलं आहे. होस्ट म्हणून बिग बी अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या शोला नवी ओळख मिळवून दिली. प्रश्नोत्तरे अशा स्वरुपात असलेल्या या शोमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांशी त्यांच्या खास शैलीत संवाद साधत कौन बनेगा करोडपती शोला नवं परिमाण मिळवून दिलं. बिग बींचा खास अंदाज आणि शोचं स्वरुप यामुळे हा शो रसिकांचा लाडका शो बनला आहे. या शोनं अनेकांची स्वप्नं पूर्ण केली आहेत. भारतीय टीव्हीच्या इतिहासामधील सगळ्यात यशस्वी कार्यक्रम म्हणून कौन बनेगा करोडपती नावारुपाला आला आहे. खुद्द बिग बींसाठी हा शो लकी ठरला आहे. अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तीक जीवनातील कठीण काळात सुरु झालेल्या या शोनं त्यांच्या कारकिर्दीला नवसंजीवनी दिली. त्यामुळेच की काय बिग बी आणि कौन बनेगा करोडपती या शोचं पहिल्या सीझनपासून एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. पहिल्या पर्वापासून ते नवव्या पर्वापर्यंत कौन बनेगा करोडपती या शोमध्ये ब-याच गोष्टी बदलल्या. अगदी बक्षिसाची रक्कम 1 कोटीपासून आता 7 कोटींवर पोहचलीय. याशिवाय स्पर्धकांसाठी असणा-या लाइफलाईनही बदलल्या आहेत. मात्र या नऊ पर्वांमध्ये एक गोष्ट बदलली नाही ती म्हणजे बिग बी अमिताभ यांचा कॉम्प्युटर. बिग बी या कॉम्प्युटरला कॉम्प्युटरजी असं आदराने संबोधतात. कॉम्प्युटरजी लॉक कर दिया जायें ही एक ओळ भारतीय टीव्हीच्या बदलाची नांदी ठरली. ‘कॉम्प्युटरजी’ची कौन बनेगा करोडपती शोमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. कोणताही प्रश्न स्पर्धकाला विचारला जातो तेव्हा तो कॉम्प्युटरवरच झळकतो. मात्र बिग बींसमोर असलेला कॉम्प्युटरजी स्क्रीनवर काय दाखवतो हे आजवर गुलदस्त्यात आहे. बिग बींच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर काय काय असते हे जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता आहे. याचबाबत जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी अनेकजण सर्च करत असतात. क्वोरा नावाच्या वेबसाईटवर कॉम्प्युटरजीच्या स्क्रीनवरील मजकूराबाबत अशाच प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. या वेबसाईटवर जाणकारांच्या माध्यमातून उत्तरं दिली जातात. कौन बनेगा करोडपती या शोमध्ये सहभागी झालेल्या अभिनव पांडे नावाच्या स्पर्धकाने त्याचं उत्तर दिलं. कौन बनेगा करोडपती शोमधील बिग बींच्या स्क्रीनवर काय काय दिसते हे आपण पाहिलं आहे असा दावा अभिनव पांडे याने केला आहे. अमिताभ बच्चन यांच्या कॉम्प्युटरवर प्रश्न, उत्तरांचे पर्याय, स्पर्धकाच्या लाइफलाईन्स याची माहिती दिलेली असते. याशिवाय हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाची माहिती, स्पर्धकाची आवडनिवड, शहर, छोटी मोठी माहिती दिलेली असते असा दावा अभिनव पांडे यांनी केला आहे. विशेष बाब म्हणजे एखादा प्रश्न ज्यावेळी विचारला जातो तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर अमिताभ बच्चन यांनाही दाखवलं जात नाही. स्पर्धकानं उत्तर लॉक केल्यानंतरच त्याचं योग्य उत्तर बिग बी यांच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर झळकतं असं अभिनव पांडे यांनी म्हटलं आहे. कौन बनेगा करोडपती या शोमध्ये अभिनव पांडे यांनी 12 लाख रुपये जिंकले होते. यावेळी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट खेळत असताना बिग बी यांच्या आपण मागे बसलो होतो. त्यामुळे त्यांच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर काय काय आहे हे आपण पाहिलं होतं असा दावा अभिनव पांडे यांनी केला आहे.     


Web Title: In the 'Kaun Banega Crorepati' show, the secret of Big B's 'Computer G' has been revealed, these things appear on the computer screen!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.