Juhi Parmar and Ashka Goradia criticized the reality show! | जूही परमार आणि आश्का गोराडियाने केली रिअॅलिटी कार्यक्रमांवर टीका!

आपल्या आवडत्या टीव्ही सेलिब्रिटींच्या वैयक्तिक जीवनातील काही गोष्टींची झलक ‘झी टीव्ही’वरील ‘जजबात… संगीन से नमकीन तक’ या नव्या चॅट शोमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते. पहिल्या दोन रंजक भागांमध्ये रोनित आणि रोहित रॉय हे अभिनेते बंधू आणि दिव्यांका-विवेक दाहिया या सर्वात लाडक्या जोडप्याशी गप्पा मारल्यानंतर या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक राजीव खंडेलवाल याने नंतर करणबीर बोहरा, अदा खान, गौरव गेरा वगैरे टीव्हीवरील अनेक लोकप्रिय कलाकारांना या कार्यक्रमात बोलते केले होते. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात टीव्ही मालिकांतील दोन सुंदर सुना आणि वास्तव जीवनात एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणी असलेल्या जूही परमार आणि आश्का गोराडिया या सूत्रसंचालक राजीव खंडेलवालशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. या गप्पांच्या ओघात या दोन रूपसुंदरी आपल्या जीवनातील काही ‘संगीन’ (गंभीर) आणि ‘नमकीन’ (विनोदी) क्षण व घटना हलक्याफुलक्या पध्दतीने प्रेक्षकांना सांगणार आहेत. या गप्पांच्या ओघात जूही आणि आश्का यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीच्या प्रवासाची माहिती दिली आणि आपल्या दोघींमध्ये मैत्रीचे नाते किती घट्ट आहे, त्यावरही चर्चा केली. या दोघी पूर्वी अनेक रिअॅलिटी कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या असून त्यामुळे या दोघींना या कार्यक्रमांमध्ये काय चालते, त्याची आतल्या गोटातील खबर होती. यावेळी त्यांनी रिअॅलिटी कार्यक्रमांतील काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या. त्यांनी या कार्यक्रमाची संधी साधून या कार्यक्रमांवर सडकून टीका केली.

आश्का गोराडिया म्हणाली, “मी एका रिअॅलिटी कार्यक्रमात सहभागी झाले होते, तेव्हा कॅमेऱ्याच्या काही करामतींद्वारे माझ्या शरीराचं मादक प्रदर्शन करण्यात आलं. यामुळे मी आणि माझ्या पालकांची मान शरमेनं खाली गेली. वास्तविक तेव्हा मी आमच्या बंदिस्त बंगल्यातील एका आजारी सहकलाकारच्या पायाला अॅलो जेलचे मालिश करीत होते. तिच्या पायावर लाल पुरळ उठलं होतं आणि राष्ट्रीय टीव्हीवरून त्याचं सर्वांना दर्शन घडू नये आणि या अभिनेत्रीची कुचंबणा होऊ नये, यामुळे मी तिच्या पायावर चादर ओढली होती आणि मी आत हात घालून तिच्या पायाला जेलचं मालिश करीत होते. पण तेव्हा त्या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी या घटनेतून वेगळा अर्थ काढून तसं सूचित करणारं चित्रण प्रसारित केलं. त्यावेळी मी त्या रिअॅलिटी कार्यक्रमाच्या नियमांनुसार एका बंगल्यात बंदिस्त जीवन जगत होते आणि मला यापैकी कशाचीही कल्पना नव्हती. त्यामुळे मी या घटनेवर कसलंही स्पष्टीकरण देऊ शकत नव्हते. नंतर माझी आई मला भेटायला आली, तेव्हा तिने मला टीव्हीवर काय दाखविण्यात आलं, त्याची मला कल्पना दिली आणि सांगितलं की आता लोक आमच्याकडे तुझ्या लैंगिक भावनांबद्दल शंका उपस्थित करीत आहेत. सुदैवाने या कार्यक्रमाचा सूत्रधार, माझा मित्रपरिवार आणि मीडिया यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्या परिस्थितीतील माझी प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला. आता आज या कार्यक्रमाच्या व्यासपिठावरून मला सार्‍्या जगाला सांगायचं आहे की मी एका अतिशय देखण्या पुरुषाशी लग्न केलं असून मी माझ्या वैवाहिक जीवनात अगदी सुखी आहे!” जूही परमार म्हणाली, “मी ज्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, तो दाम्पत्यांसाठी होता आणि त्यात मी सचिन या माझ्या माजी पतीबरोबर सहभागी झाले होते. त्यातील माझ्या सहभागाचं चित्रीकरण इतकं पूर्णपणे बदलून टाकण्यात आलं की त्यामुळे आम्ही जे करीत होतो, त्याचा सारा अर्थच बदलून गेला. त्या कार्यक्रमात मी काही कर्मचाऱ्यांबरोबर बोलत असतानाचं चित्रण केलं होतं आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीचा चेहरा कॉम्प्युटरद्वारे बदलून त्यावर माझ्या पतीचा चेहरा लावण्यात आला. त्यावरून मी माझ्या पतीशी बोलत असल्याचा भास होत होता. तसंच त्यातील टाइम झोन चुकीच्या पध्दतीने दाखविण्यात आले, त्यामुळे जी गोष्ट सकाळी केली, ती रात्री केल्याचं भासविण्यात आलं आणि त्यामुळे त्या साऱ्या वर्तनाचा अर्थच बदलून गेला. तसंच टीव्हीवरील माझी शालीन, सज्जन सुनेची प्रतिमा भंग करण्यासाठी मला नकारात्मक भूमिकेत सादर करण्यात आलं आणि सचिनची प्रतिमा ‘गरीब बिचारा’ अशी रंगविण्यात आली. नंतर जेव्हा मला दिसून आलं की त्यांनी मला खलनायिका म्हणून सादर केलं, तेव्हा मला खूपच धक्का बसला. तो फारच वाईट अनुभव होता.” 

इतकेच नव्हे, तर जूही आणि आश्का यांच्यातील मैत्रीचं नातं प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि त्यात त्यांची भरपूर करमणूकही होईल. जूहीची सुंदर मुलगी समायरा हिच्याबरोबर आश्का काही काळ व्यतीत करील. तसेच तंदुरुस्तीबद्दल  जागरूक असलेली आश्का योगाबद्दलचे आपले प्रेम दाखवून देईल. या दोन जिवलग मैत्रिणी एकत्र येत असून त्या आपले अनुभव सादर करणार असल्याने येत्या वीकेण्डचा ‘जजबात…’ चा भाग प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरेल.
Web Title: Juhi Parmar and Ashka Goradia criticized the reality show!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.