John Abraham shared his secret secret at 'DID Little Masters' program | ​‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ कार्यक्रमात जॉन अब्राहमने शेअर केले त्याचे फिटनेसचे रहस्य

लहान मुलांमधील नृत्यकौशल्याचा शोध घेणाऱ्या ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात गेल्या अनेक आठवड्यांपासून बच्चे कंपनी आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. आता स्पर्धेच्या या टप्प्यात प्रेक्षकांनी केलेले मतदान आणि श्रोत्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले असल्यामुळे परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी टॉप नऊ स्पर्धक अतिशय मेहनत घेत आहेत. येत्या शनिवारी, २६ मे रोजीच्या वीकेण्डच्या भागात या कार्यक्रमातील स्पर्धक आपल्या दमदार नृत्यशैलीने चित्रांगदा सिंह, मार्झी पेस्तनजी आणि सिद्धार्थ आनंद या तीन परीक्षकांना चकित करणार आहेत. त्याचसोबत या भागात जॉन अब्राहम विशेष उपस्थिती लावणार आहे. परमाणू या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जॉन अब्राहम ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या कार्यक्रमात नुकताच सहभागी झाला होता. या बच्चे कंपनीचे नृत्ये पाहून तोसुद्धा भारावून गेला.
या खास भागाची सुरुवात एपी रॉकर्स या स्पर्धकांनी दमदार नृत्य सादर करून केली. एपी रॉकर्सने ‘मौला मेरे लेले मेरी जान’ या गाण्यावर सादर केलेले नृत्य हे प्रेक्षणीय ठरले. त्यांचे हे नृत्य पाहून मद्रास कॅफे चित्रपटाचा हा नायक अगदी भारावून गेला होता आणि त्याने त्यांची तोंडभरून प्रशंसा केली. जॉन मुलांची स्तुती करताना म्हणाला, “तुम्ही मुलं अफलातून नाचलात आणि तुमचं सादरीकरणही राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेलं होतं. तुमचे नृत्य पाहून मला तुम्हाला माझी एक गोष्ट सांगाविशी वाटते आहे. तुम्ही जर माझं कपड्यांचं कपाट उघडलंत तर तुम्हाला त्यात दोन टी-शर्टस, दोन जीन्स पॅण्ट, हेल्मेट, जॅकेट आणि एक तिरंगा झेंडा दिसेल. त्याकडे बघून मला प्रेरणा मिळते, त्यामुळे मी कधी कधी उगाचंच माझं कपाट उघडतो.”
या कार्यक्रमात बॉलीवूडच्या या तगड्या अभिनेत्याने आपल्याविषयी अनेक अज्ञात किस्से सांगितले. त्यांनी सांगितले, “लोक मला सांगतात की, मी चालण्यापेक्षा बाईक अधिक चांगली चालवतो.” याशिवाय जॉनने आपल्या तंदुरुस्तीचे रहस्य सांगताना सांगितले की, तंदुरुस्त आणि ताकदवान राहण्यासाठी आपण दररोज निदान ३०-४० अंडी खातो!

Also Read : ​Parmanu : The Story of Pokharan : थ्रिलर आणि देशभक्तीचे मिश्रण असलेला चित्रपट
Web Title: John Abraham shared his secret secret at 'DID Little Masters' program
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.