Javed Akhtar of classic legends Season 4 | ​क्लासिक लिजंड्‌स सीझन ४चे जावेद अख्तर करणार सूत्रसंचालन

झी क्लासिक या वाहिनीवर प्रेक्षकांना क्लासिक लिजंड्‌स या कार्यक्रमाचा चौथा सिझन पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिग्गज गीतकार आणि लेखक जावेद अख्तर करणार असून भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्या कार्यातून ठसा उमटवलेल्या व्यक्तिमत्त्वांची ते आपल्या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना ओळख करून देणार आहेत. क्लासिक लिजंड्‌स या कार्यक्रमाच्या चौथ्या सीझनमध्ये भारतीय सिनेमाला आपले अमूल्य योगदान दिलेल्या १३ कलाकारांच्या जीवनात डोकावण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
हिंदी सिनेमामध्ये भरीव कामगिरी केलेल्या महान व्यक्तिमत्त्वांची प्रेक्षकांना माहिती व्हावी या हेतूने क्लासिक लिजंड्‌सची सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या तीन सीझन्सना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर झी क्लासिकने आता क्लासिक लिजंड्‌स सीझन ४ या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाविषयी जावेद अख्तर सांगतात, “झी क्लासिकसोबत क्लासिक लिजंड या खास शोच्या पहिल्या सीझनपासून मी काम करायला सुरुवात केली आणि तिथून खूप मोठा पल्ला आम्ही गाठला आहे.  हिंदी सिनेमामधील महान व्यक्तींच्या आयुष्याच्या असाधारण कथा प्रेक्षकांसमोर मांडणे ही माझ्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे.हा सिझनदेखील सिनेप्रेमींना नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे. आजच्या पिढीला बॉलिवूडमधील जुन्या कलाकारांची या कार्यक्रमामुळे ओळख होणार आहे. हिंदी सिनेमाला या कलाकारांनी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांचे हे योगदान आजच्या पिढीला देखील करणार असल्याचा मला खूप आनंद होत आहे. 
क्लासिक लिजंड्‌स सीझन ४ मध्ये बलराज साहनी, आशा पारेख, राजेंद्र कुमार, वैजयंतीमाला आणि साधना अशा कलाकारांविषयी प्रेक्षकांना माहिती मिळणार आहे. तसेच लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि कल्याणजी-आनंदजी या संगीतकारांसोबत आशा भोसले आणि हेमंत कुमार या महान गायकांविषयी माहिती देखील या कार्यक्रमात प्रेक्षकांना मिळणार आहे. तसेच अभिनेता शशी कपूर यांच्याही आयुष्यावर झी क्लासिक प्रकाश टाकणार आहे. इंडस्ट्रीमधील आपल्या विस्तृत खासगी आणि प्रोफेशनल अनुभवाचा फायदा घेत जावेद अख्तर प्रेक्षकांना यी दिग्गज कलाकारांच्या जीवन प्रवासाची एख खूप चांगली सफर घडवणार यात काही शंकाच नाही. Web Title: Javed Akhtar of classic legends Season 4
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.