Interview: Mask does not have to be executed: Tejashree Pradhan! | Interview : सूत्रसंचालन करताना मुखवटा नसतो : तेजश्री प्रधान !

-रवीन्द्र मोरे 
ओलीसुकी, झेंडा, तिची कथा, ती सध्या काय करते?, डॉ. प्रकाश बाबा आमटे, लग्न पहावे करून, शर्यत आदी मराठी चित्रपट तसेच विविध मालिकांद्वारे घरा-घरात पोहोचून अमाप लोकप्रियता मिळविलेली तेजश्री प्रधान सध्या ‘सुर नवा, ध्यास नवा...’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करणार आहे. अभिनय आणि सूत्रसंचालन या दोघांमध्ये खूप मोठा फरक असून पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणाऱ्या तेजश्रीला काय अनुभव आला याबाबत ‘सीएनएक्स’ने तिच्याशी मारलेल्या मनसोक्त गप्पा...

* प्रश्न : आतापर्यंत नायिकेची भूमिका साकारताना अभिनय केला आहे, आणि आता सूत्रसंचालन करावे लागणार आहे, तर हा अनुभव कसा वाटतो?
- भूमिका साकारताना जो अभिनय करावा लागतो, तो लेखकानुसारच करावा लागतो. म्हणजे एकप्रकारे मुखवटा घालून अभिनय करावा लागतो. मात्र सूत्रसंचालन करताना कोणताही मुखवटा लावला जात नाही. आपण जसे आहोत तसेच स्वत:ला सादर करावे लागते. विशेष म्हणजे सूत्रसंचालनाचा हा अनुभव माझ्या आयुष्यातील पहिलाच अनुभव असून हे एक माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे. 

* प्रश्न : या सांगीतिक रिअ‍ॅलिटी शोसाठी नेमकी काय तयारी करावी लागली? 
- सूत्रसंचालन करण्यासाठी आयोजकांनी माझी निवड केली, यावर माझा आधी विश्वासच बसला नाही. मात्र निवड झाल्याची खात्री झाली आणि मला अर्धी लढाई जिंकल्यासारखे वाटले. यामुळेच माझ्यातला आत्मविश्वासही वाढला. ज्याप्रकारे एखादी भूमिका साकारताना आपण सराव करतो आणि स्वत:ला विकसित करतो, त्याचप्रकारे यासाठी मी स्वत:मध्ये सूत्रसंचालकाचे गुण विकसित केले. शिवाय यातून मला बरेच काही शिकायलाही मिळाले.

* प्रश्न : सूत्रसंचालन आणि अभिनय यांमध्ये नेमका काय फरक सांगशिल?
- अभिनयात आपले वागणे, बोलणे, चालणे, दिसणे, स्वभाव आदी गोष्टी लेखकाच्या सांगण्यानुसारच असतात. मात्र सूत्रसंचालनामध्ये तसे नसते. याठिकाणी आपल्याला नॅचरली आपण जसे आहोत तसेच स्वत:ला सादर करावे लागते. म्हणजे सूत्रसंचालक म्हणून त्याठिकाणी मी तेजश्री प्रधानच असेल, दुसरे कोणतेही पात्र नसेल. 

* प्रश्न : सूत्रसंचालन करताना कुठली आवाहने वाटतात?
- हा जो रिअ‍ॅलिटी शो आहे, यात येणारे स्पर्धक हे दिग्गज सेलिब्रिटी तर आहेतच शिवाय मोठे अनुभवीदेखील आहेत. त्यांच्यासमोर सूत्रसंचालन करणे हेच माझ्यासाठी मोठे आवाहन आहे. शिवाय त्यांच्यासमोर सूत्रसंचालन करताना मी कोणत्याही प्रकारे चुकणार नाही, म्हणजे माझ्यावर दिलेली जबाबदारी मी आयोजकांच्या अपेक्षेप्रमाणेच पूर्ण करेल हेदेखील एक आवाहनच आहे.

* या शोचे वेगळेपण काय आहे?
- गाणे म्हणजे ‘सा रे गा मा पा....’ अशा आठ स्वरांचा प्रवास असतो. प्रत्येक रिअ‍ॅलिटी शोमध्ये शेवटच्या ‘सा’ पासून सुरुवात होते आणि पहिल्या ‘सा’ पर्यंत पोहचते. ही एक प्रोसेस असते. त्यानुसार प्रत्येक स्पर्धक पहिल्या एपिसोडपासून स्वत:मध्ये इंपु्रव्ह करतो आणि त्यानंतर आपणास काही एपिसोडनंतर चांगले गाणे ऐकावयास मिळतात. मात्र या शोमध्ये जे सेलिब्रिटी स्पर्धक आहेत ते अगोदरच पहिल्या ‘सा’ पर्यंत पोहोचले आहेत, म्हणजे या शोची सुरुवातच पहिल्या एपिसोडपासून रंगतदार होणार आहे. 
Web Title: Interview: Mask does not have to be executed: Tejashree Pradhan!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.