If you have a dance base TV show then you will be on TV | डान्स बेस टीव्ही शो असेन तरच टीव्हीवर परतेन

सुवर्णा जैन

प्रसिद्ध नृत्यांगणा अभिनेत्री अदिती भागवत आता यशस्वी निर्माती बनली आहे. संजय महालेसह तिनं निर्मिती केलेल्या आरसा या शॉर्ट फिल्मचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होतंय. जवळपास पाच चित्रपट महोत्सवात स्क्रीनिंग झालेल्या आरसा या शॉर्टफिल्मला दादासाहेब फाळके फेस्टिव्हलमध्ये बेस्ट स्क्रीनप्लेचा पुरस्कार मिळाला आहे. याचनिमित्ताने अभिनेत्री आणि निर्माती अदिती भागवत हिच्याशी साधलेला हा संवाद.


सुरुवातीला या 'आरसा' या शॉर्टफिल्मविषयी जाणून घ्यायला आवडेल?शॉर्टफिल्म हा प्रकार लोकप्रिय होतोय त्याविषयी थोडक्यात

लैंगिक समानतेच्या मुद्यावर या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले असून ही इंग्रजी भाषेतील शॉर्टफिल्म आहे. अमेरिकन दिग्दर्शक काला हातेफनेच या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन आणि लेखन केले होते. मानव चौहान,अदिती भागवत, सुनिता थत्ते, चारूदत्ता भागवत, पारख्या अकेरकर यांच्या भूमिका आहेत. पूर्वी फक्त बॉलिवूड ही एक मोठी इंडस्ट्री होती. मात्र आता एक नवी एक वेगळी इंडस्ट्री निर्माण होत आहे. शॉर्ट फिल्म हे एक प्रभावी माध्यम म्हणून समोर येत आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये हा बदल स्वागतार्ह आहे. 

मुळात आपल्याकडे एका गोष्टीची क्रेझ निर्माण झाली की त्याच प्रवाहात रसिक वाहत जातो.तर याविषयी काय वाटतं?

आपल्याकडे सिनेमाच्या विषयापेक्षा आकर्षण खूप महत्त्वाचे वाटते. त्यामुळे एकाच सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद खूप मिळतो. दुसरीकडे कितीही चांगला सिनेमा दिला तरी त्याकडे रसिक पाठ फिरवतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. मुळात चांगल्या विषयाच्या सिनेमाला टॅक्स फ्री करणे, चांगले प्रमोशन करत सिनेमा जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहचवयाला हवा. हल्ली तर सिनेमा शहरांप्रमाणेच गावातही शुक्रवारीच प्रदर्शित होतो.थोड रसिकांच्या  खिशाला परवडेल अशाप्रकारे काही योजना केल्या तर रसिक चांगल्या विषयांच्या सिनेमांनाही उचलून धरतील. 

मराठीतही एकच सिनेमा आला त्याची खूप चर्चा झाली, त्यानंतर येणारे सिनेमांना फारसे हिट झाले नाहीत.खरंच मराठी सिनेमाला अच्छे दिन आलेत असे तुला वाटते का?

खरंय, याला कारण म्हणजे आजही मराठी सिनेमा प्रमोशनमध्ये कमी पडतो. निवडक सिनेमाचं काही हटके विषय मांडतात तसे प्रेझेंटही करतात.मात्र अशा सिनेमाचं  प्रमाण खूप कमी आहे. चाकोरीबद्ध काम करणे सोडले तरच मराठीला चांगले दिवस आले असे ठासुन म्हणू शकतो. अजून तरी मराठीला चांगले दिवस आले आहेत असे मला वैयक्तीकरित्या वाटत नाही. मुळात मराठी सिनेमा पाहाणारा रसिकच मराठी सिनेमाकडे पाठ फिरवतो. दक्षिणकेडे त्यांचे सिनेमा त्यांचा रसिक पाहतो. आपल्याकडे तसे नाही. मुळात महाराष्ट्र, मुंबईत म्हटले की बॉलिवूडही मोठी इंडस्ट्री इथे असल्यामुळे थेट बॉलिवूडची मराठी सिनेमाशी स्पर्धा होते. बॉलिवूडप्रमाणे मराठी सिनेमा रसिकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.

छोट्या पडद्यापासून तू 2005 पासून लांब आहेस, हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला होता की नेमके काय कारण होते?

कहानी घर घर की, अवंतिका, नाम गुम जायेगा या मालिका केल्या. मुळातही आजही टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आजही पाहिजे तशी क्रांती झालेली नाही असे वाटते. आपण त्या बाबतीतही अजूनही खूप मागासलेले आहोत. जसं काळ पुढे जातो तसे आणखी आपण मागे पडतोय. मालिकेचा विषय पाहिला तर तो इतका भरकटतो की रसिकांनाही ती मालिका कंटाळवाणी वाटते. मला आजवर मालिकांसाठी मुख्य भूमिकांच्या ब-याच ऑफर आल्या मात्र त्या मी जाणीवपूर्वक नाकारल्या. कारण मला पॅशन मह्त्त्वाचे आहे, पैसा कमवणे नाही. डान्स हे माझं पॅशन आहे. डान्सच्या कार्यक्रमांसाठी माझ्या कमिटमेंट असतात. त्यात दौरे असतात त्यात एकेक दोन दोन वर्ष मालिकांना वेळ देणे जमत नव्हते. त्यामुळे मी टीव्हीपासून ब्रेक घेण्याचे ठरवले. डान्स बेस टीव्ही शो असेन तरच टीव्हीवर परतेन अन्यथा इच्छा नाही.


मुंबईत बरेच आर्टीस्ट डोळ्यात स्वप्न घेवून मुंबईत दाखल होतात काहींची स्वप्न साकार होतात काहीची निराशा होते अशांना तुला काय सांगावंसं वाटतं?

जे तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या मागचं सत्य कोणालाच माहित नसते. त्यात फक्त 1 टक्के ग्लॅमर आहे. बाकी सगळी जीवघेणी मेहनत, प्रचंड स्पर्धा, चढाओढ आहे. त्यातील नको असलेलं राजकारण या सगळ्या गोष्टीची मागणी मिळणं गरजचे असते. नाहीतर या गोष्टीची जराशीही कल्पना नसणा-यांना डिप्रेशन, ताणतणाव यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते.  सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा उडी मारा पण परत जमीनीवरच यायचे आहे हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. 
Web Title: If you have a dance base TV show then you will be on TV
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.