Dharmesh sir happened due to these people | या व्यक्तींमुळे घडला धर्मेश सर

धर्मेश सर.. डान्स प्रेमी आणि तरुणाईमध्ये प्रसिद्ध असलेले एक नाव. धर्मेश येलांडे डान्स रियालिटी शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आला आणि तरुणाईच्या काळजावर अधिराज्य गाजवू लागला. आपल्या भन्नाट डान्स स्टेप्सने त्याने सा-यांची मनं जिंकली. 'एबीसीडी', 'एबीसीडी-२' अशा सिनेमातही त्याचा जलवा पाहायला मिळाला. सध्या डान्स प्लस-३ या रियालिटी शोमध्ये जजची भूमिका पार पडतोय. याच निमित्ताने त्याच्याशी साधलेला हा खास संवाद.

डान्स क्षेत्रात तुझं नाव गाजतंय. मात्र या क्षेत्रात करियर करण्यासाठी घरच्यांचा पाठिंबाही तितकाच आवश्यक असतो. आजवर तुला कुणा कुणाची साथ लाभली ?

प्रत्येक पालकांना वाटत असतं की आपल्या मुलांनी खूप शिकावं, चांगलं करियर करावं. तसंच माझ्याही पालकांना वाटत होतं. डान्समध्ये करियर करण्यासाठी सुरुवातीला माझ्या घरातून विरोधही झाला. मात्र माझ्या वडिलांनी माझं पॅशन ओळख मला खूप पाठिंबा दिला.आईनंही कायमच माझ्यावर विश्वास दाखवला. आईचं सांगायचं तर ती खूप प्रॅक्टिकली विचार करायची. तिचंही काही चुकीचं नव्हतं.माझ्या पालकांसोबतच रेमो सरांनी मला डान्स क्षेत्रात ओळख मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. शिवाय माझे गुरु कृष्णराव ज्यांनी मला डान्सचे धडे दिले ते माझ्यासाठी कायमच प्रेरणादायी राहतील. 

डान्स क्षेत्रात नाव कमावणं, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं ही सोपी गोष्ट नाही.मात्र तुलाही स्ट्रगल तर करावाच लागला असेल, काय सांगशील ?

पाचवीत असल्यापासून मी डान्स शिकत होतो. नववी-दहावीत असताना मी डान्स क्लास सुरु केला.आयुष्यात काय करायचं हे कधीही ठरवलं नव्हतं.आयुष्यात टर्निग पॉइंट वगैरे काही असतं असं मी काही मानत नाही. कारण जोवर तुम्ही या क्षेत्रात आहात आणि इंडस्ट्रीत आहात तोवर तुम्हाला या-ना त्या पद्धतीने विविध आव्हानांना तोंड द्यावं लागतं आणि त्यांचा सामना करत पुढे जायचं असतं.बड्या बड्या कलाकारांनाही सिनेमासाठी ऑडिशन्स द्याव्या लागतात आणि त्यानंतरच त्यांना भूमिका मिळतात. तसंच माझंही आहे. मीसुद्धा याला काही अपवाद नाही. मिळालेल्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असते. फॅन्सचे भरभरुन मिळणारे प्रेम हीच माझ्या यशाची पावती. आज माझ्या कामामुळे लोक मला ओळखतात ही बाब माझ्यासाठी खूप मोठी आहे. मेहनतीला कोणताही पर्याय नसतो असं मी मानतो. 

डान्स प्लस 3 हा रियालिटी शो तू जज करतोय, आगामी काळात तुझ्या काय योजना आहेत ?

सध्या डान्स प्लस 3 हा रियालिटी शो जज करत आहे. आगामी काळात मी 'एबीसीडी-३', 'नवाबजादे' आणि एका गुजराती सिनेमावर काम करत आहे. याशिवाय अन्य एक दोन सिनेमांचीही चर्चा सुरु आहे. डान्स वेबसिरीजसाठी आणि मालिकांसाठीही ब-याच ऑफर्स येतात. मात्र इतर कमिटमेंटस असल्यामुळे त्या मी स्वीकारु शकत नाही. 

'डान्स प्लस 3' हा शो करताना तुला काय काय अनुभव येतात?

डान्स प्लस 3 हा शो जज करताना अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळतात. प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवून जात असतो असं मी मानतो. आजही स्पर्धक येतात आणि त्यांच्या हातावरील माझ्या नावाचा टॅटू पाहतो त्यावेळी खूप आनंद होतो. स्पर्धक आणि फॅन्सचं एवढं भरभरुन प्रेम मिळतं अजून आणखी काय हवं ?
Web Title: Dharmesh sir happened due to these people
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.