'Come on let's team' goes to London! | ‘चला हवा येऊ द्या’ची टीम निघाली लंडनला!!

मराठी प्रेक्षकांसह हिंदी भाषिक प्रेक्षकांना खळखळून हसविणारा ‘चला हवा येऊ द्या’ या शोने अमाप लोकप्रियता मिळविली असून, त्याचे हास्यतरंग सातासमुद्रापार पाहोचले आहेत. होय, गेल्या दीड वर्षांपासून विनोदाचे हे वादळ अजूनही अव्याहतपणे सुरूच असून, त्याची हवा आता परदेशातही पोहोचली आहे. कारण ‘चला हवा येऊ द्या’ची संपूर्ण टीम आता लंडनवारीवर निघाली आहे. होय, महाराष्टÑातील विविध जिल्ह्यांमध्ये हास्याची धमाल उडविणारा हा शो आता लंडनमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसविणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच ‘चला हवा येऊ द्या’ची संपूर्ण टीम नाशिकला आली होती. नाशिकमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात या शोचा एक एपिसोड चांगलाच रंगला होता. या एपिसोडसाठी अभिनेता रितेश देशमुख याच्यासह संपूर्ण ‘फास्टर फेणे’ची टीम उपस्थित होती. या शोमध्ये स्पष्ट करण्यात आले होते की, आता ‘चला हवा येऊ द्या’ची टीम लंडनला जाणार आहे. येत्या १२ नोव्हेंबरला लंडनच्या ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये ‘चला हवा येऊ द्या’चा खास शो रंगणार आहे. डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आदी हास्य कलाकार लंडनमधील शोमध्ये सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती लंडनमधील बाराखडी एंटरटेन्मेंटचे संचालक अमोघ धामणकर, गंधार बाबरे यांनी दिली. 

दरम्यान, लंडनमधील ‘ट्राक्सी’ हे एक प्रसिद्ध थिएटर असून, यापूर्वी स्लम डॉग मिलेनियरचे डॅनी बॉयल आणि व्हर्जिन ग्रुपचे रिचर्ड ब्रॅनसन यांनी याठिकाणी शो केले आहेत. बाराखडी एंटरटेन्मेंटने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘लई बाराचे’ हा कार्यक्रम चार ठिकाणी सादर केला होता. त्यामध्ये कुशल बद्रिके, भाऊ कदम, मंगेश देसाई, संतोष जुवेकर, विजू माने यांनी काम केले होते. आता ‘चला हवा येऊ द्या’ची टीम लंडनच्या व्यासपीठावर आपला जलवा दाखविणार असल्याने तेथील प्रेक्षकांमध्ये शोप्रतीचे आकर्षण वाढले आहे. 
Web Title: 'Come on let's team' goes to London!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.