The color of the relationship, one hourly accompaniment - Ghadge & Son | नात्यांची रंगत, एक तासाची संगत - घाडगे & सून


घाडगे & सून मालिकेमध्ये गेल्या बऱ्याच आठवड्यांपासून अक्षयचा कियाराला शोधण्यासाठी सुरु असलेली धडपड आता संपली आहे. कियारा आणि अक्षयची भेट झाली असून अमृता आणि अक्षय कियाराबद्द्लच सत्य घाडगे परिवारापासून लपवत आहेत.अमृताला ही लपवाछपवी मनापासून पटत नसली तरी देखील ती अक्षय आणि कियाराच्या प्रेमासाठी तसेच अक्षयसोबत सुरु झालेल्या नव्या मैत्रीच्या नात्यासाठी हे सगळ करण्यासाठी तयार झाली आहे. पण, अक्षयचा कियाराला स्वत:च्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी सुरु असलेला प्रयत्न जर माईना कळला तर ? अक्षयच्या या प्रयत्नामध्ये अमृताची देखील त्याला साथ आहे हे माईना कळल्यावर अमृता त्यांना कशी सामोरी जाईल ? असे आणि अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत. या सगळ्या गुंत्यामध्ये अक्षय आणि अमृता कसे आपल्या मैत्रीच्या नात्याला जपतील हे बघणे रंजक असणार आहे. प्रेक्षकांचा हा लाडका कार्यक्रम आता त्यांना एक तास बघायला मिळणे  म्हणजे रसिकांना एक मनोरंजनाची ट्रीट मिळणार आहे.अमृताचे मामा मनोहर घाडगे सदन मध्ये आपले बस्थान बसवणार आहेत, मामाचा असं करण्यामागचा हेतू अमृताला आणि अक्षयला कळला नाही. मामांच्या येण्याने घाडगे सदनामध्ये बरीच धम्माल मस्ती प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि त्यात भर म्हणजे मामांनंतर कियारा देखील घाडगे सदनामध्ये येणार त्यामुळे लपवाछपवीचा खेळ अजूनच रंगणार आहे. कियारा नुकतीच अक्षयला भेटली असून आता अक्षयसमोर अजून एक अडचण समोर आली आहे आणि ती म्हणजे कियाराच्या आयुष्यात आता अर्जुन नावाच्या मुलाचा स्थळ तिच्या वडीलांनी आणलं असून अक्षय कसं कियाराला परत मिळवेल ? अर्जुनच्या येण्याने मालिकेला कुठलं नवं वळण मिळेल ? या सगळ्या गुंत्यामधून नात्यांना एक वेगळीच रंगत येणार आहे. 


घाडगे & सून ही मालिका सुरू झाल्यापासून अक्षय आणि अमृताचे लग्न होणार की नाही याविषयी प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागली होती. अक्षय आणि अमृताने त्यांच्या मनाविरुद्ध होणारे हे लग्न होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले, पण अखेर त्या दोघांचे लग्न झाले. माईंच्या सांगण्यावरून अक्षय हे लग्न करण्यास तयार झाला. पण या दोघांनाही मनापासून एकमेकांशी लग्न केलेले नाहीये. या दोघांचीही स्वप्नं, ध्येयं पूर्णपणे वेगळी आहेत. अक्षय आणि अमृताने मनाच्या विरोधात लग्न केले आहे. त्यामुळे लग्नाच्या महिन्याभरातच वेगळे व्हायचे असे त्यांनी ठरवले होते. पण आता त्यांच्यात मैत्रीच्या नात्याची सुरुवात होणार असल्याचे कळतेय. त्यांच्या नात्याला आता एक वेगळे वळण मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.घराला एकत्र बांधून ठेवेल, आपल्या जबाबदाऱ्या योग्यप्रकारे पेलेल. घरातल्या लोकांना समजून घेईल अशी सून घाडगे परिवारासाठी माईंना हवी होती. या सगळ्या गोष्टी त्यांना अमृतामध्ये दिसल्या आणि त्याचमुळे त्यांनी परिवाराच्या सहमतीने अमृता आणि अक्षयचे लग्न करून दिले. परंतु अमृतासाठी करिअर अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे मनापासून ती अक्षयशी लग्न करायला तयार नव्हती तर दुसरीकडे अक्षयचे कियारावर प्रेम होते. त्यामुळे तो देखील माईंच्या या निर्णयाने हादरला होता. पण अनेक अडचणी पार करत माईंनी अक्षय आणि अमृताचे लग्न लावून दिले. त्या दोघांचे पटणारच नाही असे सगळ्यांनाच वाटत होते. पण आता ते दोघे मित्रमैत्रीण म्हणून तरी एकमेकांशी चांगल्या प्रकारे बोलायला लागले आहेत. 
Web Title: The color of the relationship, one hourly accompaniment - Ghadge & Son
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.