Celebration of 'Sambhaji' series with the justification of Shiv Jayanti celebrates the celebration ceremony | शिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा

आपल्या संस्कृतीत मातृऋण, पितृऋण, गुरूऋण याव्यतिरिक्त ही एक देणे असते ते ... म्हणजे समाजाचे.  हेच सामाजिक भान जपत अभिनेता अमोल कोल्हे यांनी शिवजयंतीचे औचित्य साधत ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेच्या सेटवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करत सामाजिक कार्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. जगदंब क्रिएशनची निर्मिती असलेली ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

आयुष्यात एखाद्या कठीण प्रसंगाला तोंड देत असताना,त्यावर मार्ग शोधत असताना, अनपेक्षितपणे एखाद्या चांगल्या समाजपयोगी कामाची सुरुवात होते! श्री विशाल परुळेकर आणि त्यांच्या ‘साई आधार’ या संस्थेचे कार्य ही याच पठडीतले असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या पालनपोषणाची व शिक्षणाची जबाबदारी त्यांनी उचललेली आहे. श्री.विशाल परुळेकर यांच्या या कार्याला पाठिंबा देत त्यांचा गौरव करण्यासाठी ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर नुकतेच त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी विशाल परुळेकर व ते सांभाळ करीत असलेले विद्यार्थी सेटवर उपस्थित होते. या सगळ्यांबरोबर स्नेहभोजनाचा आस्वाद घेत संभाजी मालिकेतील कलाकारांनी त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. या मालिकेतील येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड तसेच धाराऊ म्हणजे लतिका सावंत आणि पुतळाबाई म्हणजे पल्लवी वैद्य यांनी उपस्थित विद्यार्थी व विशाल परुळेकर यांचे औक्षण केले.शिवजयंतीच्या निमित्ताने शिवराय, जिजाऊ व संभाजी महाराज यांचे स्मरण करत पोवाडा व गाणी यावेळी या मुलांनी सादर केली.विशाल परुळेकर यांचे कार्य खूप मोलाचे असून ते सर्वांपुढे आणत त्यांच्या कार्याला सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.या संस्थेला डॉ.अमोल कोल्हे यांनी वैयक्तिक स्वरुपाची आर्थिक मदत सुद्धा केली आहे.

शूर आबांचे शूर छावे शंभूराजे मोठ्या रुपात पडद्यावर अवरतले आणि प्रेक्षकांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली. मोठ्या रूपातील शंभूराजांचा पराक्रम आणि बुद्धीचातुर्याचे अनेक दाखले आपण स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पाहाणार आहोतच. शंभूराजांच्या आगमनाची जितकी प्रतीक्षा प्रेक्षकांना होती तितकीच किंबहुना त्याहून अधिक डॉ. अमोल कोल्हेला होती. निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी कसरत डॉ. अमोल कोल्हे मोठ्या शिताफीने आणि प्रगल्भतेने हाताळतोय. ही भूमिका साकारण्याचा योग येणे म्हणजे श्रींची इच्छा हाच भाव त्याच्या डोळ्यांत आणि बोलण्यात जाणवतो. डॉ. अमोल कोल्हे यांनी यापूर्वीही महाराष्ट्राचं दैवत श्री छत्रपती शिवाजीमहाराजांची भूमिका साकारली त्याचप्रमाणे नाटकाच्या माध्यमातून त्याने शंभूराजेही रंगभूमीवर सादर केले पण त्याहून या मालिकेचे आव्हान अधिक मोठं आहे. या भूमिकेसाठी वजन कमी करण्यापासून शंभूराजांच्या व्यक्तिमत्त्वातले बारकावे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं.शंभूराजांचे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी असणारे बंध उलगडून दाखवताना त्यांच्या खाजगी आयुष्यातील नातेसंबंधावरही या मालिकेतून प्रकाश टाकाला जातोय. 
Web Title: Celebration of 'Sambhaji' series with the justification of Shiv Jayanti celebrates the celebration ceremony
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.