Bollywood actress to sing for Marathi serial | ​ही बॉलिवुडची अभिनेत्री गाणार मराठी मालिकेसाठी

इश्कजादे या चित्रपटातील मैं परेशान या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली गायिका शाल्मली खोलगडे आता एका मराठी मालिकेचे शीर्षकगीत गाणार आहे. शाल्मलीने ये जवानी है दिवानी या चित्रपटातील बलम पिचकारी, रेस 2 या चित्रपटातील लत लग गयी, सुलतान या चित्रपटातील बेबी को बेस पसंद है यांसारखी सुपरहिट गाणी गायली आहे. बॉलिवुडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट गाणी गायल्यानंतर शाल्मली आता मराठी मालिकेकडे वळली आहे.
मराठी मालिकांची शीर्षकगीते ही मालिकांसाठी खूप महत्त्वाची असतात. या शीर्षकगीतांमधूनच प्रेक्षकांना मालिकेच्या कथानकाविषयी माहिती मिळते. त्यामुळे मालिकांची टीम ही शीर्षकगीते बनवण्यात तितकीच मेहनत घेतात. आभाळमाया, हॅलो इन्सपेक्टर यांसारख्या मालिकांचे शीर्षकगीत काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजले होते. का रे दुरावा, होणार सून मी या घरची या मालिकांचे शीर्षकगीत तर दरम्यानच्या काळात अनेकांची कॉलर ट्युन बनले होते. त्यामुळे सध्या मराठी मालिकांच्या शीर्षकगींताना मिळत असणारे महत्त्व पाहाता बॉलिवुडमधील अनेक गायकदेखील मालिकांच्या शीर्षकगीतांना आपला आवाज देत आहेत. खुलता कळी खुलेना या मालिकेचे शीर्षकगीत तर बॉलिवुडमधील आजची आघाडीची गायिका श्रेया घोषालने गायले आहे. हे शीर्षकगीत प्रेक्षकांना प्रचंड आवडतदेखील आहे आणि आता चाहूल या मालिकेचे शीर्षकगीत शाल्मली गात आहे. शाल्मलीने नुकतेच हे गाणे रेकॉर्ड केले. शाल्मली ही मराठी असल्याने तिने एखाद्या मराठी मालिकेचे शीर्षकगीत गावे अशी तिच्या आईवडिलांची कित्येक दिवसांपासूनची इच्छा होती. ही तिची इच्छा या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झाली आहे. 
Web Title: Bollywood actress to sing for Marathi serial
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.