Blink says, every competitor winner for me | पलक मुच्छल म्हणते, माझ्यासाठी प्रत्येक स्पर्धक विजेता

‘द व्हॉइस इंडिया किड्स’ ची सर्वात लहान कोच, ते तिच्याच संघातल्या अंतिम विजेतीच्या विजयाचा जल्लोष करणारी कोच हा रोमहर्षक प्रवास पलक मुच्छलसाठी एखाद्या चमत्काराहुन कमी नाही. ती स्वतः एक प्रतिभावंत गायिका आहेच. पण, एका कोचची भूमिका निभावताना आणि तिच्या विद्यार्थिनीला यशाच्या शिखरावर पोचवताना पलकने तिचा एक वेगळाच पैलू
जगासमोर आणला आहे. तिच्या टीममधल्या छोट्या परीने, म्हणजेच आसामच्या मानशी सहारियाने अंतिम फेरी जिंकून पलकच्या कष्टांचे चीज केले आहे.


 ‘द व्हॉइस इंडिया किड्स’च्या पहिल्या सीझनच्या विजेत्या कोच ठरल्या होत्या नीती मोहन आणि आता त्यानंतरच्या सीझनमध्ये तू आणि तुझी शिष्या मानशी! महिला आघाडीचा विजय! कसं वाटतंय? 
एक तर मी एकमेव महिला कोच होते आणि वयाने सर्वात लहानसुद्धा, त्यामुळे दुहेरी समाधान आहे. हे एक निराळेच आव्हान होते कारण १४ वर्षांची असताना मी याच स्पर्धेत स्पर्धक होते आणि हिमेश रेशमिया माझे कोच होते. त्यामुळे ते अजूनही मला छोट्या मुलीसारखेच वागवतात. कोच शान हे तर माझ्याहून खूपच वरिष्ठ आहेत. अशा व्यक्तींसोबत स्टेज शेअर
करणे हा माझा बहुमान होता. 

मानशीच्या अंतिम फेरीतल्या विजयाविषयी काय सांगाल?
सगळ्या देशाला मानशीविषयी एक वेगळंच आपलेपण वाटत होतं. ती जिंकावी असं सगळ्यांनाच वाटत होतं. ती सगळ्यांची आवडती आहे आणि तीच जिंकावी असं सांगणारे कित्येक संदेश मला येत होते. पण खरं तर स्पर्धेत सहभागी झालेले सगळेच स्पर्धक माझ्यासाठी विजेते आहेत. मानशीचा हा विजय फक्त तिचाच नाही तर छोट्या गावांमधून आलेल्या सगळ्या
स्पर्धकांच्या स्वप्नांचा विजय आहे

तिचं नाव जेव्हा स्टेजवरून जाहीर झालं तेव्हा तुझ्या भावना नेमक्या काय होत्या?
पलक: मी याआधी अशा शोजमध्ये भाग घेतला नव्हता आणि ‘द व्हॉइस इंडिया किड्स’ हा माझा कोच म्हणून पहिलाच अनुभव होता. त्यामुळे अशी उत्कंठा, अशी धडधड मी याआधी अनुभवली नव्हती. खरंच सांगते आम्हा सगळ्यांमध्ये मुळीच प्रतिस्पर्ध्याची भावना नव्हती. मग ते स्पर्धक असोत किंवा कोच असोत. त्यामुळे आम्ही सगळे सारखेच अस्वस्थ आणि उत्तेजित होतो. वैयक्तिक पातळीवर माझं मानशीबरोबर एक खास नातं आहे, त्यामुळे तिचं नाव घेतलं गेलं तेव्हा मला माझे हात आभाळाला टेकल्याचा आनंद झाला. एका मोठ्या बहिणीला तिची धाकटी  बहिण जिंकल्याचा आनंद व्हावा तसाच आनंद मला झाला. मी अत्यंत भावनावश झाले होते आणि मला त्या क्षणावर विश्वास ठेवायला थोडा वेळ लागला.

या प्रवासातली तुझी मानशीबरोबरची सगळ्यात खास आठवण कुठली?
मी एकदा तिला बाहेर फिरायला घेऊन गेले होते तेव्हाची आठवण आहे. ती एका लहानशा गावातून आली आहे जिथे फक्त ३०० कुटुंबे राहतात. त्यामुळे मुंबईच्या उंच उंच इमारती, उंची गाड्या हे बघण्याची तिला सवय नाही. तिच्याबरोबर घालवलेला तो दिवस खूप खास होता कारण तिच्या डोळ्यांनी मी मुंबईकडे बघत होते. ती अक्षरशः मंत्रमुग्ध झाली होती. तिची ती मनस्थिती 
मला स्वतःला जाणवत होती. 

इथून पुढल्या प्रवासासाठी तू मानशीला काय सल्ला देशील?
पलक: सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. आणि संगीताचा रियाज कायम सुरू ठेवला पाहिजे कारण ही फक्त सुरुवात आहे. तिने स्पर्धा जिंकली आहे पण हे यश तिने तिच्या डोक्यात जाऊ देता कामा नये. यापुढेही संगीताविषयी ती संपूर्ण निष्ठा ठेवेल आणि अशीच प्रामाणिकपणे आणि समर्पण भावनेने या वाटेवर चालत राहील अशी माझी आशा आहे, कारण मोठी झाल्यावर मुंबईत येऊन पार्श्वगायन करताना तिला मला पहायचं आहे.

स्पर्धेत असलेल्या इतर स्पर्धकांना तू काय सल्ला देशील?
आधी तर मी त्याचं अभिनंदन करते. मी त्यांना सतत सांगत असते की ते सगळेच माझ्यासाठी विजेते आहेत. १ लाखाहून जास्त मुलं या स्पर्धेत उतरली होती. त्या प्रत्येकाची स्वतःची अशी एक खास गायनशैली होती. आता त्यांचा स्वतःचा एक चाहतावर्ग आहे. इतक्या लोकांची मनं जिंकणं हे स्पर्धा जिंकण्याहून मोठं यश आहे.

Web Title: Blink says, every competitor winner for me
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.