Auditions started for Big Bash 12th Season | ​बिग बॉसच्या १२ व्या सिझनसाठी सुरू झाली ऑडिशन्स

बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या कार्यक्रमाचे सगळेच सिझन आजवर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. या कार्यक्रमाचा ११ वा सिझन जानेवारी महिन्यात संपला असून शिल्पा शिंदे या सिझनची विजेती बनली. आता या कार्यक्रमाचा १२ वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिझनसाठी ऑडिशन्सना देखील सुरुवात झाली आहे. पण यंदाच्या सिझनमध्ये एक ट्विस्ट असणार आहे. कारण यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक जोड्यांमध्ये भाग घेणार आहेत. कलर्स टिव्ही वाहिनीने त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. कलर्स वाहिनीकडून ट्वीट करून सांगण्यात आले आहे की,  बिग बॉस १२ लवकरच सुरू होणार असून यावेळी स्पर्धक जोड्यांमध्ये हा खेळ खेळणार आहेत. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या जोडीदारासोबत हा खेळ खेळू शकता. या वेळी दुप्पट धमाल असणार आहे. ऑडिशनला सुरुवात देखील झाली आहे. 
बिग बॉसच्या ऑडिशनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर तुमच्यासोबत बिग बॉसच्या घरात राहू शकेल असा जोडीदार तुम्ही शोधा... बिग बॉस हा कार्यक्रम दरवर्षी ऑक्टोबरच्या सुमारास सुरू होतो. यंदादेखील हा कार्यक्रम त्याचवेळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिग बॉसच्या आजवरच्या अनेक सिझनचे सूत्रसंचालन सलमान खानने केले आहे. त्यामुळे यंदाच्या सिझनला देखील सलमानच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसेल अशी त्याच्या फॅन्सना खात्री आहे. 
बिग बॉस या कार्यक्रमाची चर्चा फक्त देशातच नाही तर जगभरात असते. या कार्यक्रमाने हिंदीतच नाही तर आपल्या प्रादेशिक भाषांमध्येही आपली हुकुमत कायम ठेवली आहे. हा बिग बॉस कार्यक्रम नुकताच मराठीत सुरू झाला आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे आणि मराठीचा झेंडा खऱ्या अर्थाने साता समुद्रापार नेणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसत आहेत. 

Also Read : झूमा भाभी बनून बिग बॉसची ‘ही’ स्पर्धक लावणार हॉटनेसचा तडका, पाहा व्हिडीओ!

Web Title: Auditions started for Big Bash 12th Season
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.