The audience will get 'Valen Baali' in the Star Stream channel on this day | ​प्रेक्षकांना या दिवशी ‘वेलडन भाल्या’ पाहायला मिळणार स्टार प्रवाह वाहिनीवर

भारतात क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तर तो धर्म आहे. प्रत्येकाला क्रिकेटविषयी प्रचंड आकर्षण असतं. शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही क्रिकेट तितकंच लोकप्रिय आहे. एका आदिवासी पाड्यावरच्या मुलाच्या क्रिकेटप्रेमाची गोष्ट आपल्याला वेल डन भाल्या या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २० मे दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर होणार आहे.
आदिवासी पाड्यात भाल्या नावाचा एक छोटा मुलगा असतो. त्याचा बाप शुकऱ्या झाडावरचा मध गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतो. फीसाठी पैसे नसल्यामुळे भाल्याची शाळाही सुटलेली असते. आता फावल्या वेळात क्रिकेट खेळणं हाच भाल्याला नाद असतो. मग आदिवासी असलेल्या भाल्याच्या या क्रिकेट आवडीचे पुढे काय होतं, हे ‘वेल डन भाल्या’ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
आई आणि मुलांच्या नात्यावर अनेक चित्रपट येऊन गेले असले तरी वडील आणि मुलांच्या नात्यावर फारसे चित्रपट पाहायला मिळत नाहीत. या चित्रपटातून वडील आणि मुलाच्या नात्याची अनोखी कहाणी दाखवण्यात आली आहे. खरं तर वडील आणि मूल यांच्यामध्ये एक अव्यक्त अतूट बंध असतो, जो मुलाला आयुष्याच्या प्रवासात निरंतर साथ करतो. वेल डन भाल्या या चित्रपटातही वडील आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत त्याचं स्वप्न साकारायला कशाप्रकारे मदत करतात याचा संवेदनशील प्रवास पडद्यावर मांडला आहे.
अचिंत्य फिल्म्स आणि सिद्धी आराध्या फिल्म्स प्रस्तुत वेल डन भाल्या या सिनेमात संजय नार्वेकर यांनी वडिलांची तर बालकलाकार नंदकुमार सोलकरने मुलाची भूमिका साकारली आहे. याशिवाय या चित्रपटाची रमेश देव, अलका कुबल-आठल्ये, राजेश कांबळे, मिताली जगताप, गणेश यादव, अंशुमन विचारे, शरद पोंक्षे, संजय खापरे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे. चैताली आणि अमोल काळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून सह-निमार्ते सुनील महाजन आहेत. नितीन सुपेकर यांनी कथा लिहिली आहे तर पटकथा संवाद नितीन सुपेकर आणि नितीन कांबळे यांचे आहेत. 

Also Read : वेल डन भाल्या चित्रपटातील कलाकारांची इको फ्रेंडली होळी
Web Title: The audience will get 'Valen Baali' in the Star Stream channel on this day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.