Anjali series is a hundredth century! | अंजली मालिकेचा धम्माल शतकोत्सव!

झी युवा वाहिनीवरील मालिका ‘अंजली ' चे १०० एपिसोड नुकतेच पूर्ण झाले. हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणाऱ्या “अंजली “या मालिकेच्या प्रेमात तरुणाई पडली आहे. या मालिकेत अंजलीची भूमिका सुरुची अडाकर साकारते आहे. सुरुचीसह यात पियुष रानडे , हर्षद अतकरी, राजन भिसे , रेशम श्रीवर्धनकर , अभिषेक गावकर , भक्ती देसाई, उमा सरदेशमुख, योगेश सोमण , मीना सोनावणे, उमेश ठाकूर , संकेत देव , अर्चना दाणी हे कलाकार आहेत.   

एखादी मालिका जेव्हा तिचे १०० भाग यशस्वी रित्या पूर्ण करते याचाच अर्थ प्रेक्षकांनी या मालिकेला पसंतीची पावती दिलेली असते . सुरुची अडारकर म्हणजेच अंजली क्षीरसागर ही नाशिक जवळच्या एका लहान गावातून आलेली एक स्वाभिमानी तरुण मुलगी.  अतिशय साधी, हुशार आणि  प्रेमळ असलेली अंजली सर्वांची अतिशय लाडकी  आहे.  तिला कोणालाही दुखवायला आवडत नाही. डॉक्टर बनण्यामागे तिची दोन मुख्य कारणे आहेत ती म्हणजे वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे आणि ज्या ठिकाणी रुग्णालये बांधली जाऊ शकत नाहीत  तिथल्या लोकांवर उपचार करण्यासाठी "मोबाईल रुग्णालय" सुरु करणे . ही स्वप्ने उराशी बाळगून घेऊन ती शहरात शिकायला  येते . अतिशय नावाजलेले असे डॉ. जनार्दन खानापुरकर (राजन भिसे) यांच्या हॉस्पिटल मध्ये ती  इंटर्नशिप करायला सुरुवात करते. तिच्याबरोबर अनुराधा आणि ओंकार हे दोघे सुद्धा इंटर्न म्हणून रुजू होतात. याच हॉस्पिटल मध्ये  जनार्दन खानापूरकर यांचा हुशार आणि निष्णात सर्जन असेलेला मुलगा  डॉ. यशस्वी खानापूरकर म्हणजेच हर्षद अतकरी अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन हॉस्पिटलचा कार्यभार हाताळत असतो. अतिशय हुशार डॉक्टर असूनही त्याची वृत्ती ही रुग्णांच्या काळजीपेक्षा व्यवहारी जास्त असते. त्याला भारतातील अतिशय प्रगत आणि तंत्रज्ञानाने समृद्ध असे हॉस्पिटल बनवायचे असते. आणि अगदी बरोबर उलट डॉ. असिम म्हणजेच पियुष रानडे हा गावोगावी फिरून गरीब रुग्णाची सेवा करत आहे. सध्या अंजली आणि पियुष यांच्या एकमेकांवरील अव्यक्त प्रेमाचा प्लॉट मालिकेत सुरु असून त्यालाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. अंजलीची तत्वे आणि यशस्वी ची स्वप्न यात नेमका कोणाचा विजय होईल हे सांगणारी ही मालिका आहे. हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी अंजली ही मराठीतील पहिलीच मालिका आहे. अंजली कश्या प्रकारे या हॉस्पिटल मध्ये तिची इंटर्नशिप ते डॉक्टर बनण्याचा  प्रवास करते आणि त्यात काय काय गोष्टी घडतात हे पाहणे एक वेगळाच अनुभव देईल . 
Web Title: Anjali series is a hundredth century!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.