Actor production is Savant's son | अभिनेत्री निर्मिती सावंतचा मुलगा आहे हा अभिनेता

आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मुलांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणं ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या आईवडिलांचा वारसा पुढे चालवण्याचा ट्रेंड फार जुना आहे. बड्या सेलिब्रिटींच्या मुलांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून आपली वेगळी ओळख निर्माण केली. हाच ट्रेंड मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळतो. महेश मांजरेकर यांचा लेक सत्या, सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया, शुभांगी गोखले यांची कन्या सखी, रविंद्र महाजनी यांचा लेक गश्मीर,महेश कोठारे यांचा लेक आदिनाथ, लक्ष्मीकांते बेर्डे यांचा लेक अभिनय यासह विविध कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आजच्या पिढीच्या कलाकारांमधलं आणखी एक नाव म्हणजे अभिनय सावंत. आपल्या नावाला सार्थ ठरवत त्यानं अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. आता हा अभिनय म्हणजे नक्की कोण असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. अभिनय सावंत म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा लेक.'गंगूबाई नॉनमॅट्रिक'पासून ते 'जाऊबाई जोरात' या मालिकेपर्यंत रसिकांना खळखळून हसवणा-या अभिनेत्री म्हणजे निर्मिती सावंत.आपल्या अभिनयानं आणि कॉमेडीच्या अफाट टायमिंगनं त्यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा लेक अभिनयही या मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित श्रीमंत दामोदरपंत या सिनेमातून अभिनयनं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. यासोबतच प्रसाद आचरेकर दिग्दर्शित अकल्पित सिनेमातही त्याने काम केलं. मात्र अभिनयात करियर करण्यासाठी त्याने कधीही आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. या क्षेत्रात येण्याआधी शिक्षण पूर्ण करण्याची अट आपल्या आईने घातल्याचं त्यानं सांगितलं होतं. मात्र आईने स्वतःचं नाव वापरुन कुठेच पुढे केले नसून स्वतःच्या बळावर या चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अभिनय मोठ्या अभिमानाने आणि आत्मविश्वासाने सांगतो. 
Web Title: Actor production is Savant's son
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.