मुंबई:  iPhone X ची विक्री भारतात सुरू झाली आहे. भरमसाठ किंमत असून देखील या फोनची जोरदार विक्री सुरू आहे.  सध्या ज्यांनी या फोनची प्री-बुकिंग केली होती त्यांनाच हा फोन मिळतोय.
भारतात  iPhone X 64GB व्हेरिअंटची किंमत 64 हजार रूपये आहे, तर 128GB व्हेरिअंटची किंमत  1 लाख 2 हजार रुपये आहे.  पण आता हा फोन तुम्ही केवळ 26 हजार 700 रूपयांमध्ये खरेदी करू शकतात. पण त्यासाठी काही अटी आहेत. 
रिलायन्स जिओने ज्या प्रमाणे  iPhone 8, 8 Plus वर कॅशबॅक ऑफर दिली होती तशीच ऑफर iPhone X साठी आणली आहे. हो...हे खरंय... जिओ कंपनी 70 टक्के बायबॅक देणार आहे. पण ही ऑफर मिळवण्यासाठी जिओने एक महत्वाची अट ठेवली आहे. तुम्ही वर्षभर हा फोन वापरून सुस्थितीत जर रिलायन्स जिओला परत केला तर कंपनी तुम्हाला 70 टक्के बायबॅक देणार आहे.  
काय आहे अट -
सर्वात पहिले तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की बायबॅक ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला हा फोन एका वर्षाच्या वापरानंतर सुस्थितीत रिलायन्स जिओला परत करावा लागेल. या व्यतिरिक्त दर महिन्याला 799 रूपयांचं रिचार्ज करणं आवश्यक आहे. या रिचार्जद्वारे तुम्हाला  90GB 4G डेटा आणि अनिलिमिटेड कॉलिंग मिळेल. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकाचवेळी 9,999 रूपये भरून एका वर्षासाठी रिचार्ज करू शकतात. 
म्हणजे तुम्ही केवळ 26 हजार 700 रूपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकतात असं नाहीये. तर फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण किंमत द्यावी लागेल. तसंच फोन वर्षभर वापरून परत केल्यानंतर जिओ तुम्हाला 70 टक्के पैसे परत देईन असंही नाहीये. तर त्या बदल्यात तुम्ही तेथून दुसरा स्मार्टफोन खरेदी करू शकतात आणि यासाठी कंपनी तुम्हाला व्हाउचर देणार आहे.
दरवर्षी नवा  iPhone घेणा-यासाठी ही खूप चांगली ऑफर आहे, पण इतरांना या ऑफरचा फायदा होणार नाही. 
कशी मिळवायची ऑफर -   
जिओच्या अधिकृत वेबसाइटवर iPhone X बायबॅक या पर्यायावर क्लिक करावं. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. वेबसाइटनुसार सिटी बॅंकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर 8000 रूपये एक्स्ट्रा कॅशबॅक मिळणार आहे.