पेटीएम विरूद्ध व्हॉटसअ‍ॅप : इनबॉक्सच्या माध्यमातून रंगणार सामना

By शेखर पाटील | Published: November 6, 2017 11:09 AM2017-11-06T11:09:26+5:302017-11-06T11:16:48+5:30

पेटीएमने व्हाटसअ‍ॅपला जोरदार टक्कर देण्यासाठी इनबॉक्स हा मॅसेंजर लाँच केला असून यात डिजिटल पेमेंटची व्यवस्था करण्यात आली आहे.

whatsapp vs paytm | पेटीएम विरूद्ध व्हॉटसअ‍ॅप : इनबॉक्सच्या माध्यमातून रंगणार सामना

पेटीएम विरूद्ध व्हॉटसअ‍ॅप : इनबॉक्सच्या माध्यमातून रंगणार सामना

googlenewsNext

सध्या विविध टेक कंपन्यांमधील स्पर्धा अगदी चुरशीच्या स्तरावर पोहोचली आहे. वरकरणी पाहता पेटीएम आणि व्हाटसअ‍ॅप या कंपन्यांमध्ये कोणत्याही स्तरावरील स्पर्धा असण्याची शक्यता धुसर आहे. म्हणजे पेटीएम ही कंपनी डिजीटल पेमेंट आणि ई-कॉमर्सशी संबंधित आहे. तर व्हाटसअ‍ॅप हा मॅसेंजर असून याच्या माध्यमातून वैयक्तिक वा सामूहिक पातळीवरील चॅटींग आणि ऑडिओ/व्हिडीओ कॉलिंगची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

तथापि, गेल्या काही महिन्यांपासून व्हाटसअ‍ॅपतर्फे पेमेंट प्रणालीची चाचणी घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. व्हाटसअ‍ॅपतर्फे याला दुजोरादेखील देण्यात आला आहे. यानुसार व्हाटसअ‍ॅप भारत सरकारच्या युपीआय या प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम लाँच करणार आहे. ही प्रणाली खास भारतीय युजर्ससाठी विकसित करण्यात येत आहे. अर्थात याच्या माध्यमातून चॅटींगसोबत डिजीटल व्यवहारदेखील करता येणार आहेत. म्हणजेच यामुळे पेटीएमला अप्रत्यक्षत स्पर्धा निर्माण होऊ शकते. नेमकी हीच बाब लक्षात घेत पेटीएमने इनबॉक्स या नावाने नवीन चॅटींग अ‍ॅप लाँच केले आहे. यात चॅटींगसह डिजीटल पेमेंटची व्यवस्था आहे. वुईचॅट या चिनी तर हाईक या भारतीय मॅसेंजरनंतर इनबॉक्स हे डिजीटल व्यवहाराची सुविधा असणारे तिसरे मॅसेंजर बनले आहे.

पेटीएम इनबॉक्समध्ये व्हाटसअ‍ॅपच्या बहुतांश सुविधा आहेत. यात मित्र वा कुटुंबियांसोबत चॅटींग करण्याची सुविधा आहे. यात पैसे पाठविणे आणि मागविणे या दोन्ही सुविधा असतील. याच्या माध्यमातून टेक्स्ट, प्रतिमा, व्हिडीओज आणि अ‍ॅनिमेशन्सची देवाण-घेवाण करता येईल. व्हाटसअ‍ॅपने अलीकडेच सादर केलेले रिकॉल व लोकेशन शेअरिंग हे फिचर्सदेखील यात देण्यात आले आहेत. याच्या जोडीला पेटीएमवरील विविध डील्स आणि ऑफर्सदेखील यात असतील. या माध्यमातून विविध उत्पादनांची ऑर्डरदेखील देता येईल. तर यावर विविध गेम्सचाही आनंद लुटता येणार आहे. म्हणजेच पेटीएमने एकचदा मॅसेजींग, डिजीटल पेमेंट आणि ई-शॉपींग या तिन्ही सुविधा इनबॉक्समध्ये प्रदान केल्या आहेत. यामुळे सध्या तरी यातील फिचर्स हे व्हाटसअ‍ॅपपेक्षा सरस दिसून येत आहेत. याचा सामना करण्यासाठी आता व्हाटसअ‍ॅप नेमके कोणते फिचर्स आणतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या इनबॉक्स मॅसेंजर अँड्रॉइड प्रणालीसाठी सादर करण्यात आला असून लवकरच याला आयओएस प्रणालीसाठी सादर करण्यात येणार आहे.

Web Title: whatsapp vs paytm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.