ठळक मुद्देइंटरनेटशिवाय देखील पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. BHIM अ‍ॅपच्या मदतीने पैसे ट्रान्सफर करणे सहज शक्य होणार आहे.BHIM App सोबत (USSD) देखील आता अपग्रेड करण्यात आले आहे. आपल्याला एक स्मार्टफोन आणि त्यामध्ये BHIM APP अ‍ॅप डाऊनलोड करणे गरजेचे असणार आहे.

नवी दिल्ली - सध्या ऑनलाईनचा जमाना असल्याने सर्वच गोष्टी या ऑनलाईन पद्धतीने केल्या जातात. प्रामुख्याने रोख रक्कम देण्याऐवजी पैशाचे व्यवहार हे ऑनलाईन केले जातात. मात्र हे व्यवहार करताना अनेकदा इंटरनेटची आवश्यकता असते. पण तुम्हाला माहिती आहे का? आता इंटरनेटशिवाय देखील पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. BHIM अ‍ॅपच्या मदतीने पैसे ट्रान्सफर करणे सहज शक्य होणार आहे. बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल नंबरच्या मदतीने असं करणं सोपं झालं आहे. मात्र यासाठी आपल्याला यूएसएसडी (USSD) आधारित मोबाईल बँकिंग वापरणे आवश्यक असणार आहे. 

BHIM App सोबत (USSD) देखील आता अपग्रेड करण्यात आले आहे. त्यासाठी आपल्याला एक स्मार्टफोन आणि त्यामध्ये BHIM APP अ‍ॅप डाऊनलोड करणे गरजेचे असणार आहे. तसेच BHIM APP वर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. एकदा सिम कार्ड आणि स्मार्टफोन आपल्या बँक खात्याशी कनेक्ट झाल्यानंतर, आपण भीम अ‍ॅपच्या मदतीने पैसे ट्रान्सफर करू शकतो. बऱ्याच वेळा दूरवरच्या कनेक्शनवर इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नसतं. म्हणून BHIM Appचे हे वैशिष्ट्य अतिशय उपयुक्त ठरणार आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही पैसे ट्रान्सफर करता येणार आहे.

इंटरनेट उपलब्ध असेल तर आपल्याला यूपीआय (UPI) कोडच्या आधारवर व्यवहार करणे आवश्यक आहे. जर इंटरनेट उपलब्ध नसेल तर आपण यूएसएसडी (USSD) आधारवर मोबाईल बँकिंगचा पर्याय निवडू शकता. यासाठी आपल्याला *99# डायल करण्याची आवश्यकता आहे. आपल्या फोनवर एक स्वागत स्क्रीन असेल. यामध्ये पैसे पाठवा (Send Money), पैसे मागवा(Request Money), चेक बॅलन्स (Check Balance), माझे प्रोफाइल (My Profile), प्रलंबित विनंती (Pending Requests, व्यवहार (Transaction) आणि यूपीआय (UPI) पिन हे सात पर्याय दिसतील. या पर्यायांना निवडल्यानंतर मोबाईल नंबर, पेमेंट पत्ता, सेव्हिंग बेनिफिट किंवा आयएफएससी(IFSC) कोड आणि अकाऊंट नंबरच्या सहाय्याने पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

देशात डिजिटल व्यवहाराला चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेलं  ‘भारत इंटरफेस फॉर मोबाईल’ अर्थात ‘भीम’ हे अ‍ॅप सर्वात लोकप्रिय ठरलं आहे. ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे लॉन्च तयार केलं होतं. कॅशलेस अर्थात रोकडरहित व्यवहार अधिक सहज आणि सोप्या पद्धतीनं व्हावेत या दृष्टीने  ‘भीम’ अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली होती. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने तयार केलेलं हे अ‍ॅप  डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं होतं. त्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अ‍ॅप समर्पित असल्याचं म्हणत त्यांच्या भीमराव नावापासूनच या अ‍ॅपचं नामकरण भीम असं करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. 
 
कसं काम करतं हे  ‘भीम’ अ‍ॅप?

- अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोनवर लॉन्च अ‍ॅप BHIM प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा.

- त्यानंतर तुमचं बँक खातं आणि त्यासोबत यूपीआय पिन तयार करा. (हा पर्याय अप डाऊनलोड करतानाचा विचारला जातो)

-  तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल.

-  मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर भीम अ‍ॅपचा वापर करता येईल.

-  इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचा पर्याय या अ‍ॅपमध्ये सध्या उपलब्ध आहे.

सावधान...! तुमची बँक अकाऊंट हॅक होताहेत...असे वाचवा!

इंटरनेटच्या जमान्यात नवीन पिढी आजकाल बँकिंग सुविधा मोबाईल, कम्प्युटरवर वापरत आहे. युपीआय सेवा देणारे सरकारी भीम अ‍ॅप तसेच अन्य खासगी अ‍ॅपमुळे पैसे वळविणे एकदम सोपे झाले आहे. तसेच बँकाही त्यांचे अ‍ॅप आणि इंटरनेट, मोबाईल बँकिंग सेवा देत आहेत. यामुळे तुमच्या कष्टाची जमापुंजीवर डोळा असलेले हॅकरही सरसावले आहेत. त्यांच्यापासून वाचण्यासाठी सतत जागरूक राहणे गरजेचे आहे. नाहीतर बँकेतील पैसे गायब होण्याची शक्यता आहे. हॅकिंगमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असलेला प्रकार म्हणजे फिशिंग. तुमच्या बँकेची किंवा एखाद्या शॉपिंग साईटसारखी हुबेहूब वेबसाईट किंवा पेज तयार करायचे; त्याच्यावर आकर्षक ऑफर्स द्यायच्या आणि तुमचा लॉगीन आयडी पासवर्ड, बँक एटीएमचे डिटेल्स मिळवायचे हा एक प्रचलित प्रकार आहे. इमेलमध्ये किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर या पानाची लिंक पाठवायची  आणि त्यावर क्लिक करायला लावायचे. या फिशिंगमुळे अनेकांना गंडा घातला गेला आहे. हा प्रकार सोशल मीडियाचे डिटेल्स मिळविण्यासाठीही केला जातो. यामुळे अशा लिंकपासून सावध राहावे. 

 


Web Title: transfer funds help bhim app very easy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.