आकर्षक रंग व ऑफरसह मिळणार हा स्मार्टफोन

By शेखर पाटील | Published: April 24, 2018 09:44 AM2018-04-24T09:44:51+5:302018-04-24T09:44:51+5:30

स्मार्टरॉन कंपनीने आपला टी. फोन पी या स्मार्टफोनची गोल्ड एडिशन बाजारपेठेत लाँच केली असून यासोबत अतिशय आकर्षक अशी गोल्ड ऑफरदेखील देण्यात आली आहे.

This smartphone will be available with attractive colors and offers | आकर्षक रंग व ऑफरसह मिळणार हा स्मार्टफोन

आकर्षक रंग व ऑफरसह मिळणार हा स्मार्टफोन

मुंबई- या वर्षाच्या प्रारंभी स्मार्टरॉन कंपनीने टी. फोन पी या थोड्या विचित्र नावाने स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला होता. आता हेच मॉडेल गोल्ड अर्थात सोनेरी रंगाच्या पर्यायात ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. ही नवीन आवृत्ती ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आली आहे. याच्या लाँचींगसाठी स्मार्टरॉन कंपनीने डिस्को किंग आणि गोल्डमॅन म्हणून ख्यात असणार्‍या भप्पी लाहिरीसोबत करार केला आहे. भप्पीदाने यासाठी सोशल मीडियातून सोना कहा है या नावाने एक कँपेन सुरू केले आहे. खरं तर ही एक काँटेस्ट म्हणजेच स्पर्धा आहे. यात विजयी होणार्‍या  स्पर्धकांना स्मार्टरॉन टी. फोन पी मॉडेलची गोल्ड एडिशन जिंकण्याची संधी आहे. हा स्मार्टफोनदेखील मूळ आवृत्तीप्रमाणेच ७,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. रंग वगळता यातील अन्य फिचर्सदेखील मूळ मॉडेलनुसारच असतील.

या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकारमानाचा एचडी(१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह फिंगरप्रिंट स्कॅनर, ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, युएसबी-ओटीजी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

स्मार्टरॉन टी.फोन पी या मॉडेलमध्ये क्विक चार्ज तंत्रज्ञानाचा सपोर्ट असणारी तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल दोन दिवसांचा बॅकअप देत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. विशेष म्हणजे ही बॅटरी फक्त ९० मिनिटांमध्ये पूर्णपणे चार्ज करता येते. एवढेच नव्हे तर युएसबी-ओटीजी केबलच्या माध्यमातून या बॅटरीच्या मदतीने अन्य स्मार्टफोन, टॅबलेट, स्मार्टबँड आदी उपकरणांना चार्ज करता येते. यात एफ/२.२ अपार्चर आणि एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा आहे.  
 

Web Title: This smartphone will be available with attractive colors and offers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.