Samsung's two air purifiers | सॅमसंगचे दोन एयर प्युरिफायर

सॅमसंग कंपनीने थ्री-वे एयर फ्लो या तंत्रज्ञानाने सज्ज असणारे दोन एयर प्युरिफायर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. सध्या वायू प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अर्थात जलशुध्दीकरणाप्रमाणे आता वायू शुध्दीकरण उपकरणांच्या बाजारपेठेतही नवनवीन प्रॉडक्ट येत आहेत. अन्य उपकरणांप्रमाणे एयर प्युरिफायरमध्येही एंट्री लेव्हलची उपकरणे लोकप्रिय झाली आहेत. शाओमीने अलीकडेच अवघ्या ८,९९९ रूपये मूल्यात एयर प्युरिफायर लाँच करून या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्मित केले आहे. या पार्श्‍वभूमिवर, सॅमसंगने एएक्स७००० आणि एएक्स३००० हे दोन एयर प्युरिफायर लाँच केले आहेत. या दोन्ही मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे ४१,९९० आणि १५,४९० रूपये असेल.

सॅमसंग एएक्स७००० या मॉडेलमध्ये सीएडीआर म्हणजेच क्लीन एयर डिलीव्हरी रेट हे फिचर देण्यात आले आहे. तसेच यात डिजीटल इर्न्व्हटर मोटरदेखील आहे. यामुळे ते टिकावू आणि अधिक उत्तम पध्दतीने कार्य करते. यात चार टप्प्यांमधील एयर फिल्टर प्रणाली दिली आहे. यात प्री-फिल्टर, कार्बन आणि डी-ऑडरायझेशन फिल्टर, पीएम२.५ फिल्टर आणि व्हायरस डॉक्टर यांचा समावेश आहे. याच्या मदतीने हवा अधिक उत्तम पध्दतीने शुध्द होत असते. हा एयर प्युरिफायर ९२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या परिसरातील वायूची शुध्दीकरण करत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात डिजीटल मीटर देण्यात आले असून याच्या मदतीने परिसरातील वायूच्या प्रदूषणात होणार घट अगदी रिअल टाईम या पध्दतीने दिसू शकते. याच्या मदतीने हवेतील पीएम२.५ या घातक घटकासह धुळ, जीवाणू आदींसह प्रदूषणाच्या सर्व घटकांची सफाई होते.

दरम्यान, सॅमसंग एएक्स३००० या मॉडेलच्या मदतीने ३९ वर्ग मीटर क्षेत्रफळाच्या परिसरातील वायूचे शुध्दीकरण होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यात प्रिमीयम मॉडेलमधील बहुतांश फिचर्स आहेत. हे दोन्ही मॉडेल्स अनुक्रमे ८० वॅट आणि ३४ वॅट इतक्या विजेचा वापर होतो.