Samsung's Noise Concessioned Earphones | सॅमसंगचे नॉइस कॅन्सलेशनयुक्त इयरफोन्स

सॅमसंग कंपनीने भारतीय बाजारपेठेत नॉइस कॅन्सलेशन या सुविधेने सज्ज असणारे इयरफोन्स उतारण्याची घोषणा केली आहे.

अलीकडच्या काळात अनेक प्रिमीयम इयरफोन्सचे मॉडेल्स हे नॉइस कॅन्सलेशन या तंत्रज्ञानाने सज्ज असतात. यामुळे बाहेरील आवाजाचा अडथळा न येता कुणीही संगीताचा आनंद घेऊ शकतो. या अनुषंगाने सॅमसंगच्या 'लेव्हल इन इयरफोन्स' या मॉडेलमध्येही हीच सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात सुमारे २० डेसीबल्स इतक्या बाह्य ध्वनीला अटकाव करण्यात येत असल्याचा दावा सॅमसंगतर्फे करण्यात आला आहे. यात बाह्य आवाजांचा त्रास कमी करण्यासाठी अभिनव मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये दोन संवेदशील मायक्रोफोन्स लावण्यात आले आहेत. ते बाहेरील सर्व आवाज एकत्र करून याचे विश्‍लेषण करतात. यानंतर यातील अनावश्यक आवाज आणि अर्थातच या ध्वनींची तीव्रता कमी करून ते युजरपर्यंत पोहचवतात. 

सॅमसंगच्या 'लेव्हल इन इयरफोन्स' यामध्ये ११० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज झाल्यानंतर सुमारे १० तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर यात इन-लाईन या प्रकारातील रिमोट प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने ध्वनी कमी-जास्त करणे, म्युझिक ट्रॅक बदलणे तसेच कॉल रिसीव्ह वा रिजेक्ट करणे आदी बाबींचे कार्यान्वयन करता येते. हे इयरफोन्स काळा आणि पांढरा या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ३,७९९ रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत.