ठळक मुद्देआता कुणीही आपल्या स्टोरीजमध्ये त्याला हव्या त्या विषयावर मतदान घेऊ शकतोयासाठी आवश्यक असणारी प्रतिमा सिलेक्ट करून कुणीही या प्रकारचे पोलींग घेऊ शकतोहे पोलींग संबंधीत युजरच्या स्टोरीजवर अन्य युजर्सला दिसून ते या मतदानात भाग घेऊ शकतात

इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अ‍ॅपने ताज्या अपडेटमध्ये आपल्या स्टोरीज या फिचरमध्ये पोलींग स्टीकरच्या माध्यमातून मतदान घेण्याची सुविधा प्रदान केली आहे. इन्स्टाग्राम अ‍ॅपने अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीसाठी ताजे अपडेट सादर केले आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे पोलींग स्टीकर होय. याच्या अंतर्गत आता कुणीही आपल्या स्टोरीजमध्ये त्याला हव्या त्या विषयावर मतदान घेऊ शकतो. यासाठी आवश्यक असणारी प्रतिमा सिलेक्ट करून कुणीही या प्रकारचे पोलींग घेऊ शकतो. हे पोलींग संबंधीत युजरच्या स्टोरीजवर अन्य युजर्सला दिसून ते या मतदानात भाग घेऊ शकतात. सध्या तरी या फिचरमध्ये दोन पर्यायांच्या प्रश्‍नावर मतदान घेण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात कोणत्या बाजूने किती मते पडली? हे कुणीही पाहू शकतो. तर पोलींग घेणार्‍या युजरला यात नेमक्या कुणी मतदान केलेय? याची माहितीदेखील मिळू शकते. स्टोरीजप्रमाणे हे पोलींगदेखील २४ तासांनी नष्ट होणारे असेल.

या फिचरसोबत इन्स्टाग्राम अ‍ॅपच्या ताज्या अपडेटमध्ये कलर पिकर आणि टेक्स्ट/स्टीकर अलायनमेंट हे दोन फिचरदेखील देण्यात आले आहे. कलर पिकरच्या नावातच नमूद असल्यानुसार हे टुल रंगांसाठी वापरण्यात येणार आहे. याचा वापर करण्यासाठी कलर पिकरच्या सर्वात खाली डाव्या बाजूस असणार्‍या आयड्रॉपर या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. यानंतर तो युजर त्याला हव्या असणार्‍या रंगावर क्लिक करून तो रंग प्रतिमा आणि व्हिडीओजवरील शब्द अथवा रेखाटनांसाठी वापरू शकतो. तर टेक्स्ट/स्टीकर अलायनमेंट या फिचरच्या मदतीने कुणीही प्रतिमेवरील स्टीकर अथवा शब्दांना अचूकपणे हव्या त्या ठिकाणी लाऊ शकतो. यासाठी छायाचित्राच्या मध्यभागी निळी रेषा दिसणार असून यावरून कुणीही आपल्याला हवे ते शब्द अथवा स्टीकर योग्य त्या ठिकाणी लाऊ शकतो. हे सर्व फिचर्स इन्स्टाग्राम अ‍ॅपच्या अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींच्या युजर्सला वापरता येणार आहेत.