Now Google Assistant in Geophone, the world's first feature phone | आता जिओफोनमध्ये गुगल असिस्टंट, जगातील पहिला फिचरफोन

रिलायन्सच्या जिओफोनमध्ये आता व्हाईस कमांडवर चालणारा गुगल असिस्टंट प्रदान करण्यात आला असून अशी सुविधा असणारा हा जगातील पहिला फिचरफोन बनला आहे.

रिलायन्स जिओतर्फे ऑगस्ट महिन्यात जिओफोन लाँच करण्यात आला आहे. यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्कच्या मदतीने इंटरनेट ब्राऊजींगसह काही अ‍ॅप्लीकेशन्स वापरता येत असले तरी हा परिपूर्ण स्मार्टफोन नव्हे तर फिचरफोन होय. यामुळे यातील अ‍ॅप्सच्या वापराला बर्‍याच प्रमाणात मर्यादा आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आता जिओफोनमध्ये गुगल असिस्टंट हा ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांडवर चालणारा व्हर्च्युअल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. गुगलच्या दिल्ली येथील कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. याप्रसंगी जिओफोनवरील गुगल असिस्टंटच्या वापराची झलक दर्शविणारा डेमोदेखील दर्शविण्यात आला. यात जिओफोनमध्ये कुणीही इंग्रजी आणि हिंदी या भाषांमधील विविध व्हाईस कमांडचा वापर करू शकतो. याच्या मदतीने कुणीही गुगलवरील सर्चसह कॉल करणे, एसएमएस करणे वा विविध अ‍ॅप्सचा वापर करणे आदी बाबी करू शकतो. याशिवाय, ऑडिओ आणि व्हिडीओ ऐकणे/पाहणे या बाबीदेखील यातून शक्य आहेत. जिओफोनमध्ये गुगल असिस्टंटसाठी खास विकसित करण्यात आलेली आवृत्ती देण्यात आल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

गुगल असिस्टंट हा आता स्मार्टफोनचा अविभाज्य घटक बनू पाहत आहे. तथापि, फ्लॅगशीप, मध्यम तसेच काही किफायतशीर श्रेणीतल्या मॉडेल्समध्ये आजवर गुगल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमिवर जिओफोनसारख्या (१५०० रूपयांचे तीन वर्षांसाठी डिपॉजिट घेऊन मिळणार्‍या!) फिचरफोनमध्ये हा व्हर्च्युअल असिस्टंट देण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. मात्र हे अपडेट नेमके केव्हा मिळेल? याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आलेली नाही. याबाबत रिलायन्स जिओ लवकरच अधिकृत घोषणा करेल असे मानले जात आहे.