नोकिया आणणार स्वस्त फोर-जी फिचर फोन

By शेखर पाटील | Published: October 9, 2017 07:56 AM2017-10-09T07:56:38+5:302017-10-09T15:31:45+5:30

एचएमडी ग्लोबल कंपनी आपल्या नोकिया ब्रँडच्या माध्यमातून अत्यंत स्वस्त दरात फोर-जी फिचर फोन लॉन्च करणार असून यामुळे जिओ फोनला आव्हान उभे राहू शकते. तर एकंदरीतच या क्षेत्रातील स्पर्धादेखील यामुळे तीव्र होण्याचे संकेत आहेत.

nokia set to launch cheap feature phone | नोकिया आणणार स्वस्त फोर-जी फिचर फोन

नोकिया आणणार स्वस्त फोर-जी फिचर फोन

खरं तर रिलायन्स कंपनीच्या अत्यंत किफायतशीर जिओफोनमुळे अन्य कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. मुळातच नेट न्युट्रिलिटीचा दुसरा अध्याय स्मार्टफोनच्या माध्यमातून सुरू होणार असल्याचे कधीपासूनच स्पष्ट झाले आहे. या संदर्भात लोकमतवर आधीच 'नेट न्युट्रिलिटी २.०: आता स्वस्त स्मार्टफोनच्या मैदानावरील लढाई' या शीर्षकाखाली लेख प्रकाशित करण्यात आला आहे. सेल्युलर कंपन्या एकीकडे स्वस्त डाटा प्लॅन्स जाहीर करून ग्राहकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असून दुसरीकडे किफायतशीर मोबाइल हँडसेटही दिले जात आहेत. यातून मिळवलेल्या ग्राहकांना काय द्यावे आणि काय नको हे सर्वाधिकार त्याच कंपनीच्या हातात राहणार आहेत. यामुळे भारतीय मोबाईल कंपन्यांमध्ये जिओफोनमुळे हँडसेट उत्पादनाची स्पर्धा सुरू झाली आहे. एयरटेल लवकरच स्वस्त मोबाईल हँडसेट लाँच करणार आहे. बीएसएनएलनेही काही भारतीय कंपन्यांच्या मदतीने किफायतशीर मोबाइल बाजारपेठेत उतारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर आयडियानेही याची चाचपणी सुरू केली असताना या क्षेत्रात आता नोकिया कंपनीने उडी घेतली आहे.

नोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकियाचे जोरदार रिलाँचिंग केले आहे. याच्या अंतर्गत नोकिया ८ या फ्लॅगशीप स्मार्टफोनसह अन्य काही किफायतशीर मॉडेल्सदेखील सादर करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कधी काळी प्रचंड गाजलेल्या नोकिया ३३१० या मॉडेलची थ्री-जी आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येईल असे वृत्त मध्यंतरी आले होते. तथापि, भारतातील फोर-जी नेटवर्कचा वाढता आलेख पाहता नोकिया कंपनी याऐवजी अत्यंत स्वस्त मूल्यात फोर-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी असणारा फिचर फोन सादर करण्याची माहिती समोर आली आहे. एचएमडी ग्लोबल कंपनीच्या भारतीय विभागाचे उपाध्यक्ष अजय मेहता यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. जिओफोनला मिळालेल्या प्रतिसादानंतर आपली कंपनी भारतात अत्यंत किफायतशीर मूल्यात फोर-जी फिचरफोन लाँच करण्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. यात जिओफोनप्रमाणे फोर-जी आणि फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्कचा सपोर्ट असेल. 

रिलायन्सचा जिओफोनदेखील पूर्णपणे स्मार्टफोन नाहीय. यात इंटरनेट सर्फींगसह विविध अ‍ॅप्सचा वापर करण्याची सुविधा असली तरी यात स्मार्टफोनचे सर्व फिचर्स नाहीत. नोकिया कंपनीच्या फिचर फोनमध्येही याच स्वरूपाचे फिचर्स असण्याची शक्यता आहे. असे झाल्यात जिओफोनला तगडे आव्हान उभे राहणार यात शंकाच नाही. यातून नोकिया कंपनीच्या वाटचालीचे एक वर्तुळ पूर्ण होण्याची शक्यतादेखील बळावणार आहे. नोकिया कंपनी कधी काळी भारतात मोबाईल उत्पादनात आघाडीवर होती. बर्‍याच वर्षानंतर नोकिया पुन्हा शिखरावर जाणार का? याचे उत्तर या कंपनीच्या स्वस्त फिचरफोनला मिळालेल्या प्रतिसादावर पूर्णपणे अवलंबून असेल हे निश्‍चित.

Web Title: nokia set to launch cheap feature phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.