New version of LG V30 smartphone | एलजी व्ही ३० स्मार्टफोनची नवीन आवृत्ती
एलजी व्ही ३० स्मार्टफोनची नवीन आवृत्ती

लास व्हेगास शहरात सुरू झालेल्या 'सीईएस-२०१८' या टेक प्रदर्शनात विविध कंपन्या आपापल्या नवीन प्रॉडक्टचे अनावरण करत आहेत. या अनुषंगाने एलजी कंपनीने आपल्या एलजी व्ही३० मॉडेलची रासबेरी रोझ ही नवीन आवृत्ती सादर करण्याची घोषणा केली आहे. नावातच नमूद असल्यानुसार याचा रंग पिंक असेल. भारतीय बाजारपेठेत एलजी व्ही३० प्लस हे मॉडेल डिसेंबर महिन्यात लाँच करण्यात आले असले तरी अद्याप एलजी व्ही३० स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आलेला नाही. या पार्श्‍वभूमिवर याची नवीन आवृत्ती भारतात थोडी उशीरा येण्याची शक्यता आहे. 

बाह्यांगाचा अपवाद वगळता एलजी व्ही३० या स्मार्टफोनमध्ये आधीनुसारच फिचर्स असतील. यामध्ये मागील बाजूस १६ व १३ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे आहेत. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असेल. याच्या मुख्य कॅमेर्‍यात सिने व्हिडीओ हे विशेष फिचर देण्यात आले आहे. यात १६ विविध फिल्टर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, यात पॉइंट झूम हे फिचर असेल. यामुळे व्हिडीओ चित्रीकरण करतांना स्क्रीनवरील कोणत्याही बिंदूपर्यंत झूम करता येणार आहे. तसेच यात क्रिस्टल क्लिअर या प्रकारातील लेन्स असेल. यामुळे एलजी व्ही ३० या मॉडेलमध्ये आयफोनच्या तोडीचा कॅमेरा असल्याचे दिसून येत आहे. मल्टीमिडीयाच्या चांगल्या अनुभुतीसाठी यात हाय-फाय क्वॉड डीएसी हे फिचर देण्यात आले आहे. तर डिजीटल मायक्रोफोनमुळे दर्जेदार ध्वनीमुद्रण करता येणार आहे. एलजी व्ही ३० मध्ये वायरलेस चार्जींगसह ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्ट रेझिस्टंट आहे.  

एलजी व्ही-३० या स्मार्टफोनमध्ये ६ इंच आकारमानाचा १८:९ हे गुणोत्तर असणारा क्युएचडी म्हणजेच १४४० बाय २८८० पिक्सल्स क्षमतेचा ओएलईडी डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते दोन टेराबाईटपर्यंत वाढविण्याची सुविधा आहे.
 


Web Title: New version of LG V30 smartphone
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.