Lenovo's full-featured display smartphone | लेनोव्होचा फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन

बहुतांश कंपन्यांच्या मार्गावरून जात लेनोव्होने के३२०टी हा फुल व्ह्यू डिस्प्ले असणारा स्मार्टफोन लाँच केला असून याचे मूल्यदेखील अतिशय किफायतशीर आहे.

अलीकडच्या काळात बहुतांश उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्समध्ये फुल व्ह्यू डिस्प्ले देण्यात आल्याचे आपण पाहतच आहोत. काही मध्यम किंमतपट्टयातील मॉडेल्समध्येही याची सुविधा असते. मात्र आजवर तरी बजेट स्मार्टफोनमध्ये हे फिचर नसल्याची बाब उघड आहे. भारतीय बाजारपेठेचा विचार केला असता मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास इन्फीनिटी या मॉडेलचा अपवाद वगळता १० हजार रूपयांच्या आतील एकाही स्मार्टफोनमध्ये फुल व्ह्यू डिस्प्लेची सुविधा नाहीय. या पार्श्‍वभूमिवर, लेनोव्हो के३२०टी हा स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल होत आहे. याचे चीनी युऑनमधील मूल्य ९९९ इतके (सुमारे ९७६० रूपये) आहे. यातील ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले १८:९ अस्पेक्ट रेशोयुक्त आहे. या २.५ डी वक्राकार ग्लासयुक्त एलसीडी आयपीएस डिस्प्लेचे स्क्रीन-टू-बॉडी हे गुणोत्तर ८१.४ टक्के असेल. यात स्प्रेडट्रम क्वॉड-कोअर प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा असेल.

लेनोव्हो के३२०टी या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. यात ८ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्‍यांचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. कंपनीने पहिल्यांदा हे मॉडेल चीनमध्ये उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.
 


Web Title: Lenovo's full-featured display smartphone
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.